बंडखोरांना मीतत गाडून नव्या दमाने शिवसेना उभी करू – अनंत गीते

0
242

महाड, दि. १२ (पीसीबी) – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार करणारा शिवसैनिक असूच शकत नाही. बंडखोरांनी शिवसैनिकांमध्ये संभ्रम निर्माण करू नये. पुढील निवडणुकीत शिवसैनिक त्यांना त्यांची जागा दाखवतील, असा इशारा माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी सोमवारी शिवसेनेच्या निर्धार मेळाव्यात दिला.

रत्नागिरी जिल्ह्यातून आमदार योगेश कदम आणि उदय सामंत बंडखोरी करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाले आहेत. शिवसेनेच्या विरोधात बंड करूनसुद्धा आम्ही शिवसैनिकच आहोत असे दोघेही ठामपणे सांगत आहेत. त्यामुळे या मेळाव्यात गीते यांनी दोन्ही बंडखोर आमदारांचा समाचार घेतला. तसेच भाजपवरही सडकून टीका केली. ते म्हणाले की, नारायण राणे, छगन भुजबळ यांनी केलेले बंड वैयक्तिक होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेले बंड भाजपप्रणित आहे. या बंडातून सामान्य जनतेला किंवा शिवसैनिकांना काहीही मिळणार नाही. सत्तेसाठी लाचार झालेले हे आमदार बंडात सहभागी झाले आहेत. जे गेलेत ते परत येणार नाहीत. या बंडखोरांच्या गळ्यात भाजपाने पट्टा बांधला आहे. त्याची साखळी भाजपच्या हातात आहे.

यापुढे शिवसेना सर्व निवडणुका स्वबळावर लढणार असा निर्धार आज करू या, असे आवाहन करुन गीते म्हणाले की, शिवसेनेचे चिन्ह आणि शिवसेना पक्ष कोणीही घेऊ शकत नाही. कारण आपली घटना तशी आहे. जे घडले ते घडले. यापुढे त्याची चर्चा करत न बसता या गद्दारांना अद्दल घडवण्यासाठी आणि संकटात आलेल्या शिवसेनेला पुन्हा उभारी देण्यासाठी सर्वांनी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची गरज आहे.रायगडमधील मेळाव्यात आपण महाडमधील भुताला बाटलीत बंद करणार, असे सांगितले होते. त्याचप्रमाणे रत्नागिरी आणि दापोलीतील भुतालाही बाटलीत बंद करण्याची ताकद येथील शिवसैनिकांमध्ये आहे, असेही ते म्हणाले.

चिपळूण आणि गुहागरमध्ये बंडखोरी झालेली नाही. परंतु बंडखोर ज्या दिशेने चालले आहेत ते पाहिल्यावर आपल्याकडे बंडखोरी होणार नाही, असे सांगता येत नाही. त्यामुळे बंडखोरीची लागण लागण्यापूर्वीच हा निर्धार मेळावा घेतला आहे. गरम दुधाने तोंड भाजते. त्यामुळे आता ताकसुद्धा फुंकून प्यावे लागणार आहे, अशी टिप्पणी गीते यांनी केली.

कुणाच्या जाण्याने चिंता नको – राजन साळवी
शिवसेना उपनेते आमदार राजन साळवी म्हणाले की, रत्नागिरी जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून तो यापुढेही अभेद्यच राहील. यापूर्वीही काहीजण शिवसेना सोडून गेल्यानंतर पक्ष खिळखिळा होईल, असे अनेकांना वाटले होते. मात्र तसे झालेले नाही. त्यामुळे यापुढेही कुणाच्या जाण्याने चिंता करण्याची गरज नाही. उदय सामंत शिवसेनेत आल्यानंतर त्यांना शिवसेनेने मंत्रीपदासह भरभरून दिले. एकवेळ माझ्यावर अन्याय झाला. मात्र आपण संघटना मानणारे आहोत. कारण शिवसेनेमुळेच सर्वसामान्य शिवसैनिक आज वेगवेगळी पदे मिरवत आहे. यापुढेही संघटनेला अधिक उभारी देत पक्षप्रमुखांचे हात बळकट करण्याचे आवाहन साळवी यांनी केले.