बँक मॅनेजरला ब्लॅकमेल करत खंडणी मागणाऱ्या दोघांना अटक

0
833

भोसरी, दि. २० (पीसीबी) – बँकेच्या मॅनेजरला ब्लॅकमेल करून अडीच लाखांची खंडणी मागणाऱ्या महिलेसह दोघांना खंडणी विरोधी पथकाने अटक केली. खंडणीची रक्कम घ्यायला बोलावून पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले.

गणेश लक्ष्मण कोळी (वय 27, रा. शिवाजीनगर रेल्वे स्टेशन झोपडपट्टी, पुणे) आणि एक महिला अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

‘तुझे रेकॉर्डिंग व व्हॉट्स अप चॅटिंग आहे. आम्हाला अडीच लाख रुपये पाहिजे. नाहीतर तुला खोट्या गुन्ह्यात अडकवून तुझी नोकरी घालवू व संपवून टाकू’ अशी धमकी भोसरी परिसरातील एका राष्ट्रीयकृत बँकेच्या मॅनेजरला धमकी आली. त्यामुळे मॅनेजरने सुरुवातीला 25 हजार रुपये भीतीपोटी आरोपींना दिले. त्यानंतर आरोपींनी आणखी दोन लाख रुपयांची मागणी केली.

याबाबत मॅनेजरने पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्याकडे तक्रार केली. आयुक्तांनी खंडणी विरोधी पथकाला याप्रकरणी कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार मॅनेजरला आरोपिंसोबत तडजोड करण्यास सांगून दीड लाख रुपये घेण्यासाठी बोलावले. आरोपी खंडणीची रक्कम घेण्यासाठी आले असता सापळा लावलेल्या पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. आरोपींना पुढील कारवाईसाठी भोसरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.