फ्लिपकार्टच्या हब मधून मोबाईल चोरणाऱ्या काळेवाडीतील दोन डिलिव्हरी बॉयला अटक

0
406

काळेवाडी , दि. २८ (पीसीबी) : फ्लिपकार्टच्या बिग बिलियन डे दरम्यान वाढलेल्या कामाचा गैरफायदा घेत डिलिव्हरी बॉय म्हणून काम करणाऱ्या दोघांनी त्याच्या एका अल्पवयीन साथीदारासोबत मिळून हब मधून 38 मोबाईल लंपास केले. ही घटना काळेवाडी येथे घडली. याप्रकरणी दोन डिलिव्हरी बॉयना अटक करून त्यांच्या अल्पवयीन साथीदाराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

आशिष भाऊसाहेब भोसले (वय 22, रा. रमाबाईनगर, पिंपरी), पियुष गोविंद मोहिते (वय 23, रा. नेवाळेवस्ती, चिखली) अशी अटक केलेल्या डिलिव्हरी बॉयची नावे आहेत. याप्रकरणी 27 वर्षीय महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलीस उपायुक्त डॉ. काकासाहेब डोळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला इन्स्टाकार्ट सर्विस या फ्लिपकार्टच्या ऑनलाईन कुरिअर कंपनीत काम करतात. त्यांच्या कंपनीत आशिष हा डिलिव्हरी बॉयचे काम करतो. ऑक्टोबर महिन्यात सुरु झालेल्या बिग बिलियन डे निमित्त नागरिकांनी ऑनलाईन खरेदी केली. त्यामुळे ऑनलाईन कुरिअर कंपन्यांचा ताण वाढला. इन्स्टाकार्ट सर्विसेस या कंपनीत देखील कामाचा ताण होता. त्याचा गैरफायदा घेऊन आरोपी आशिष आणि त्याच्या साथीदारांनी कंपनीच्या हब मधून 9 लाख 47 हजार 160 रुपये किमतीचे 38 मोबाईल फोन चोरून नेले.

पोलिसांनी सुरुवातीला आशिष आणि त्याच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी करत त्यांच्याकडून पोलिसांनी आठ मोबाईल फोन हस्तगत केले. त्यानंतर त्यांचा तिसरा साथीदार पियुष याला देखील अटक करण्यात आली. तिघांकडून पाच लाख 91 हजार 244 रुपये किमतीचे 24 मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विठ्ठल साळुंखे, सहायक निरीक्षक संतोष पाटील, उपनिरीक्षक सचिन चव्हाण, सहायक फौजदार बिभीषण कन्हेरकर, बाबाजान इनामदार, राजेंद्र काळे, पोलीस अंमलदार वंदू गिरे, प्रशांत गिलबिले, अतिक शेख, विक्रांत चव्हाण, राम तळपे, अजय फल्ले, भास्कर भारती, स्वप्नील लोखंडे, सौदागर लामतुरे, कौंतेय खराडे, विनायक घारगे, रमेश खेडकर, सागर पंडित यांनी केली.