हिंजवडी, दि. २९ (पीसीबी) – फ्रीज दुरुस्तीच्या बहाण्याने आलेल्या दोघांनी व्यक्तीकडून तीन हजार 250 रुपये घेऊन खोटे व बनावट इन्व्हाईस देत फसवणूक केली. ही घटना शनिवारी (दि. 23) दुपारी वाकड येथे घडली.
अरुण गुलाब डुंबरे (वय 43, रा. वाकड) यांनी याप्रकरणी गुरुवारी (दि. 28) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार व्हर्लपूल कस्टमर केअर नावाने गुगलवर जाहिरात टाकणारी व्यक्ती, 18001038441 या क्रमांकावरून व्हर्लपुल कंपनीच्या कस्टमर केअर मधून बोलत असल्याचा बनाव करणारी व्यक्ती, रफिक उर्फ रफिकउद्दीन अब्दुल ललित चौधरी (वय 28, रा. जाधववाडी, चिखली), मोहम्मद फिरोज मो. अब्दुल (वय 21, रा. पवारवस्ती, दापोडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादींनी त्यांच्या घरातील व्हर्लपूल कंपनीचा खराब झालेल्या रेफ्रिजरेटरच्या दुरुस्तीकरिता इंटरनेटवर कस्टमर केअरचा नंबर शोधला. त्यातील एका लिंकवर क्लिक करून 18001038441 यावर कॉल केला. समोरून बोलणा-या व्यक्तीने तो खरोखर व्हर्लपूल कंपनीतून बोलत असल्याचे भासवून दोघांना फिर्यादींच्या घरी पाठवले. त्या दोघांनी फिर्यादी यांचा रेफ्रिजरेटर दुरुस्त केल्याचा बनाव करून फिर्यादीकडून गुगल पे द्वारे तीन हजार 250 रुपये रक्कम घेऊन खोटे आणि बनावट इन्व्हाईस देऊन फसवणूक केली. पोलिसांनी रफिक आणि मोहम्मद फिरोज या दोघांना अटक केली आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.