फोफसंडी गावात २ वैद्यकीय डाॅक्टरांची उज्वल कौतुकास्पद कामगिरी!..

0
38

दि . ९ ( पीसीबी ) – अहिल्यानगर जिल्ह्यातील अतिदुर्गम आणि निसर्गरम्य सह्याद्रीच्या कुशीत वसलेले अकोले तालुक्यातील हरिश्चंद्रगड कळसूबाई अभय अरण्यांतर्गत असणारे निसर्गरम्य अतिदुर्गम ऐतिहासिक फोफसंडी गाव आज अभिमानाने भरून आले आहे. कारण, या आदिवासी भागातून दोन होतकरू विद्यार्थ्यांनी वैद्यकीय क्षेत्रात आपली मुशिकत गाजवत ‘डाॅक्टर’ ही प्रतिष्ठित पदवी संपादन केली आहे.

फोफसंडी गावातील पहिली डाॅ. मुलगी डॉ. पुष्पांजली वळे आणि पहिला डाॅ. मुलगा डॉ. ऋत्विक कोंडार यांनी एमबीबीएस परीक्षा उत्तीर्ण करत आपल्या गावाचे, कुटुंबाचे आणि समाजाचे नाव उज्ज्वल केले आहे.
डाॅ. पुष्पांजली वळे, या चैतन्य विद्यालय ओतूर येथील शिक्षक ज्ञानदेव शिवाजी वळे सर यांच्या कन्या. पुष्पांजली लहानपणापासून अभ्यासू आणि कुशाग्र बुद्धीच्या पुष्पांजलीने इ. ४थीमध्ये स्कॉलरशिप आणि इ. ५वीला नवोदय परीक्षा उत्तीर्ण करत नवोदय विद्यालयात शिक्षण घेतले. विशेष बाब म्हणजे, कोणत्याही खासगी क्लासशिवाय NEET परीक्षेत यश मिळवत तिने भाऊसाहेब हिरे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, धुळे येथे वैद्यकीय शिक्षण घेतले. सध्या ती धुळे येथे इंटर्नशिप करत असून आदिवासी भागातील जनतेसाठी सेवा करण्याचा ती संकल्प करत आहे.

दुसरीकडे, पुष्पावती विद्यालय डिंगोरे येथे कार्यरत असलेले शिक्षक श्री.मंगेश मारुती कोंडार सर यांचे सुपुत्र ऋत्विक कोंडार यानेही अकोले तालुक्यातील फोफसंडी गावातील पहिला पुरुष डाॅक्टर होण्याचा मान मिळवला आहे. इ. ५वीला नवोदय परीक्षा उत्तीर्ण करत नवोदय विद्यालय पिंपळे जगताप, पुणे येथे इ.१२ वी पर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर त्याने NEET परीक्षा उत्तीर्ण करून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज, सांगली येथून आपले एमबीबीएस शिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले.
दोघांनीही अतिशय हलाखीच्या परिस्थितीत, दुर्गम भागातून वाट काढत, केवळ अभ्यास, चिकाटी आणि जिद्दीच्या जोरावर हे यश मिळवले. या दोघांनी आदिवासी भागातील इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आदर्श घालून दिला आहे.

फोफसंडी गावातील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ पंचक्रोशीतील नोकरदार वर्ग तसेच “नक्षत्राचं देणं काव्यमंच, महाराष्ट्र राज्य” आदिवासी बांधव यांच्यावतीने आणि राज्यभरातून अनेकांनी फोन करून, प्रत्यक्ष भेटी आणि सोशल मीडियाद्वारे दोघांनाही हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
ही गोष्ट आहे स्वप्नांची, जिद्दीची आणि शिक्षणाच्या दिव्य प्रकाशाची… फोफसंडी गावात आता शिक्षक, पोलिस, इंजिनिअर,कवी, लेखकांबरोबर डॉक्टरांचंही उज्वल भविष्य प्रेरणादायी आहे.