फोन पे वरून पैसे घेत तरुणाला लुटले

0
243

पिंपरी, दि. १० (पीसीबी)- फोन पे वरून पैसे घेऊन दोघांनी एका तरुणाला लुटले. ही घटना मंगळवारी (दि. 7) मध्यरात्री एक वाजता जुना पुणे-मुंबई महामार्ग, पिंपरी येथे घडली.

प्रवीण मनोज शिरसाठ (वय 23, रा. रांजणगाव एमआयडीसी, पुणे) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे एका कंपनीत काम करतात. ते मंगळवारी मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास कंपनीच्या बस मधून जुना पुणे-मुंबई महामार्गावर पिंपरी येथे उतरले. तिथून ते बीआरटी रोड ओलांडून जात असताना विरुद्ध दिशेने आलेल्या दुचाकीवरील दोघांनी फिर्यादी यांना अडवले. आम्हाला पैसे दे नाहीतर तुला मारीन. तुला पुलावरून फेकून देईन, अशी धमकी दिली.

फिर्यादी यांनी आपल्याकडे पैसे नसल्याचे सांगितले असता चोरट्यांनी फिर्यादीच्या खिशात जबरदस्तीने जात घालून 21 हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन आणि पाच हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. फिर्यादीला एका फोन पे नंबरवर 1400 रुपये पाठवण्यास सांगितले. रोख रक्कम, मोबाईल फोन, ऑनलाईन पैसे आणि स्मार्ट वॉच घेऊन चोरटे पळून गेले. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.