- किरण माने यांच्या पोस्टवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीयांचा पाऊस
मुंबई, दि. १९ (पीसीबी) – अभिनेता किरण माने सतत काही न काही कारणांमुळे चर्चेत राहत असतात. त्यांनी काही दिवसांपूर्वीच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे बऱ्याचदा ते राजकीय मत देखील मांडत असतात. सोशल मिडियाच्या माध्यमातून ते आपले मत नोंदवत असतात.
नुकतीच त्यांची एक पोस्ट चर्चेत आली आहे. या पोस्टमध्ये त्यांचा रोख नेमका कुणाकडे आहे, अशी चर्चा होत आहे. नेटकरी या पोस्टचा सरळ संबंध उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लावत आहेत. या पोस्टवर नेटकरीही अनेक प्रतिक्रिया नोंदवत आहेत.
मी दुसऱ्याची तिजोरी फोडली आणि श्रीमंत झालो यात अभिमान कसला? शरम वाटली पाहीजे. तुला तुझ्या हिमतीवर एक पै कमावता आली नाही, हा तुझा नाकर्तेपणा आहे. तुझा एकही ‘बंदा’ तुला मोठा करता आला नाही, असं किरण मानेंनी पोस्टमध्ये म्हटलंय.
फोडून आणलेल्या खजिन्यातल्या चवल्या-पावल्यांचा तुला सतत टेकू लागतो. तू सगळ्यात मोठा दरिद्री आहेस. अशी पोस्ट किरण माने यांनी केली आहे, या पोस्टबरोबर #ज्याचीलाजत्याचाच_माज असा हॅशटॅग त्यांनी दिला आहे. या पोस्टची आता एकच चर्चा रंगली आहे.
किरण मानेंच्या पोस्टवर नेटकऱ्यांच्या कमेंट्स
‘याचा सरळ अर्थ याच्या बापजाद्याची श्रीमंत व्हायची लायकी नव्हती आणि अक्कलही नव्हती त्यांना…!’, ‘सत्तेचा माज आणि उर्मटपणाचा कळस आहे हा. आज ना उद्याला उतरल्यावरच समजेल,’ अशा कमेंट्स किरण माने यांच्या पोस्टवर नेटकरी करत आहेत.
तर एकाने म्हटलं की, ‘ज्या गोष्टीची लाज वाटली पाहिजे ती अभिमानाने सांगतात .. पुन्हा आलो ते पण दोन पक्ष फोडून. यायचं होत तर स्वत:च्या पक्षाच्या बळावर यायचं होत. दुसऱ्यांची घर फोडून कुटुंब फोडून जीवा भावाची माणस तोडून जे आनंद मिळवू शकतात ते कधी ही कोणाचा ही बळी देऊ शकतात आणि सर्वांत आधी बळी ते बाहेरून आलेल्यांचा देणार,’ किरण माने यांच्या पोस्टचा रोख हा फडणवीस यांच्याकडे आहे काय?, असा सवाल आता केला जात आहे.