पिंपरी दि. १३ (पीसीबी) -आलिशान कार शोरूम मधून मिळण्यासाठी वेटिंग असल्याने कमी कालावधीत कार मिळवून देतो असे सांगून एका व्यक्तीकडून तब्बल ४० लाख रुपये घेतले. पैसे घेऊन कार न देता व्यक्तीची फसवणूक केली. हा प्रकार १८ डिसेंबर २०२१ ते २६ जानेवारी २०२२ या कालावधीत एम्पायर इस्टेट चिंचवड, मोरवाडी पिंपरी आणि लाखोटा टोयोटा शोरूम मीरारोड पूर्व मुंबई येथे घडला.
प्रशांत बाबुलाल चौधरी (रा. पुनावळे, पुणे. मूळ रा. मालाड पूर्व मुंबई), वाघाराम उर्फ विमलभाई पन्नाजी कळबी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी हरीश भोपाळसिंग पुरोहित (वय ५०, रा. रहाटणी) यांनी १२ जुलै रोजी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेली माहितीनुसार, फिर्यादी यांना त्यांच्या मुलीच्या लग्नात फॉर्च्युनर कार गिफ्ट द्यायची होती. मात्र ती कार मिळण्यासाठी आठ महिने वेटिंग होते. त्यामुळे फिर्यादी यांच्या ओळखीचा आरोपी प्रशांत चौधरी यास फिर्यादी यांना संपर्क केला. आरोपीने एका महिन्यात कार काढून देतो असे आमिष दाखवले. १८ डिसेंबर २०२१ रोजी एम्पायर इस्टेट चिंचवड येथील शनी मंदिराजवळ भेटून कारची किंमत ४७ लाख १० हजार ५४ रुपये असून अगोदर ३० लाख आणि कारची डिलिव्हरी मिळाल्यानंतर उर्वरित पैसे देण्याचे ठरले. त्याच दिवशी फिर्यादी यांनी रोख १५ लाख रुपये आणि आरटीजीएस द्वारे १५ लाख रुपये आरोपीला दिले.
गाडीचे मॅपिंग आणि ऍक्सेसरीज कारण्यासाठी २५ हजार रुपये घेतले. त्यांनतर गाडी डिलिव्हरी देण्यास्तही तयार असल्याचे सांगून मोरवाडी पिंपरी येथे बोलावून आरोपीने १० लाख रुपये घेतले. उर्वरित रक्कम चेकने देण्याचे ठरल्याने २६ जानेवारी २०२२ रोजी फिर्यादी यांचा मुलगा आणि जावई आरोपीच्या मुंबई येथील कार्यालयात गेले. तिथे आरोपी भेटला नाही. त्यामुळे लाखोटा टोयोटा शोरूम येथे भेट दिली असता तिथेही आरोपी भेटला नाही. फिर्यादी यांनी पुनावळे येथील आरोपीच्या घरी जाऊन पाहिले असता आरोपी तिथेही भेटला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादी यांनी पोलिसात धाव घेत फिर्याद नोंदवली आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.