फॉरेक्समध्ये गुंतवणुक करण्यास सांगत दहा लाखांची फसवणूक

0
270

पिंपरी, दि. ७ (पीसीबी) – फॉरेक्स मध्ये ऑनलाईन गुंतवणूक केल्यास जास्त नफा मिळेल असे आमिष दाखवून एका व्यक्तीची १० लाख १७ हजार ६३१ रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर या कालावधीत गहुंजे येथे घडला.

संदीप बाबूभाई पटेल (वय ३७, रा. गहुंजे, ता. मावळ) यांनी रविवारी (दि. ६) शिरगाव परंदवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पटेल यांच्याशी आरोपीने टेलिग्राम या अप वरून संपर्क केला. फोरेक्समध्ये ऑनलाईन गुंतवणूक केल्यास जास्त नफा मिळेल असे आरोपीने आमिष दाखवले. पटेल यांना वारंवार पैसे पाठवण्यास प्रवृत्त करून आरोपीने १० लाख १७ हजार ६३१ रुपये घेतले. त्यानंतर नफा अथवा मूळ रक्कम न देता फसवणूक केली. शिरगाव परंदवडी पोलीस तपास करीत आहेत.