फेरीवाल्या आईचा मुलगा जाणार माउंट एव्हरेस्टवर…..

0
165

महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाने खारीचा वाटा देत दिल्या शुभेच्छा…….

पिंपरी दि.३०(पीसीबी) – सिंहगड किल्ल्यावरती अनेक वर्षापासून लिंबू सरबत, ताक विकणाऱ्या सोनाबाई उघडे यांचा मुलगा लहू उघडे हा जगातील सर्वात उंच असणाऱ्या गिरीमोहिमेवर निघाला आहे ,माऊंट एव्हरेस्ट शिखर सर करण्यासाठी सज्ज झाला असून लवकरच तो प्रस्थान ठेवणार आहे. यासाठी नॅशनल हॉकर फेडरेशन, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाने आज खारीचा वाटा देत फेरीवाल्यांकडून जमा केलेले अर्थसहाय्य देत स्वागत व ध्वज प्रदान कार्यक्रमाचे आयोजन निगडी येथे करण्यात आले. यावेळी सर्वांनी त्याला भरभरून शुभेच्छा दिल्या.

महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते, जन आंदोलनाच्या राष्ट्रीय समन्वयाचे प्रसाद बागवे, गिर्यारोहक लहू उघडे, कार्याध्यक्ष इरफान चौधरी, महासंघाच्या महिला अध्यक्षा वृषाली पाटणे, सागर बोराडे,ओमप्रकाश मोरया, प्रसाद मारणे, वीरेंद्र गुप्ता, रामा बिराजदार, मनोज यादव , सुशील खरात विशाल मेहेर, हरी भोई, आबा शेलार, अशोक गुप्ता आदी उपस्थित होते.

यावेळी नखाते म्हणाले की प्रत्येकाने आपल्या आयुष्यामध्ये एक उद्दिष्ट, एक ध्येय ठेवलेले असते अशाच पद्धतीने एका फेरीवाल्या आईचा मुलगा आज गिरीमोहिमेमध्ये सहभागी होत आहे, महाराष्ट्रात शिखरे यशस्वी चढाई केल्यानंतर जगातील सर्वोच्च असणाऱ्या माउंट एवरेस्ट या गिरी मोहिमेवर जात असून माणसाच्या आयुष्यामध्ये जिद्द चिकाटी आणि मेहनत असल्यास अशक्य ते शक्य होते. गिरीमोहिमेमध्ये सर्वात महत्त्वाचा भाग एक शारीरिक क्षमता मानसिक स्थैर्य आणि आर्थिक मदत या सर्व गोष्टी जुळवताना अनेक अडचणी निर्माण होतात परंतु समाजातील काही लोकांच्या बळावरच अशा मोहिमा यशस्वी होत असतात.

राज्यातील साहसी क्रीडा प्रकार म्हणजे गिर्यारोहण महाराष्ट्रातील अनेक अशा अनेक अवघड मोहिमा लहू यांनी पार केल्या यात भागीरथी, युनाम, कोकणकडा रॅपलिंग, लिंगाणा, देवकुंड रॅपिल्लिंग, जीवधन वानरलिंगी व्हॅली क्रॉसिंग, वजीर, तैल-बैल, भैरवगड याचा समावेश आहे .एस.एल ऍडव्हेंचरचा लीडर म्हणून अनेक तरुणांना गिर्यारोहणाचे धडे दिले आहेत.

यावेळी प्रसाद बागवे म्हणाले लहू हा प्रतिकूल परिस्थितीतून सराव, अंगमेहनत या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनात अनेक दिवसांपासून सुरू आहे. आपल्या मदतनिधीतुन सामान्य तरुण जगातील सर्वोच्च शिखरावर भारताचा झेंडा फडकवू शकतो त्यासाठी आवाहन करण्यात आले.