पिंपरी दि. २० (पीसीबी) – हॉकर झोनमध्ये सोयी सुविधा द्याव्यात. महापालिकेची अतिक्रमण कारवाई आणि एकतर्फी निर्णय घेतले जात असल्याचा आरोप करत त्याच्या निषेधार्थ पिंपरी-चिंचवड शहरातील पथारी, हातगाडी, टपरीधारकांनी नॅशनल हॉकर फेडरेशन, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघातर्फे आज (मंगळवारी) महापालिका मुख्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.
शहरातील दापोडी, निगडी, आकुर्डी, भोसरी, चिंचवड, वाल्हेकरवाडी, घरकुल, पिंपरी, सांगवी चौक आदी परिसरातील विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला. महासंघाचे अध्यक्ष, कामगार नेते काशिनाथ नखाते, माजी नगरसेवक मारुती भापकर, कार्याध्यक्ष राजू बिराजदार, इरफान चौधरी, प्रदेश संघटक अनिल बारवकर, किरण साडेकर, रोहिदास शिवणेकर, अनिल मंदिलकर,सुखदेव कांबळे,तुकाराम माने,संभाजी वाघमारे, वहिदा शेख, माधुरी जलमुलवार,वृषाली पाटणे,अरुणा सुतार, नंदा तेलगोटे,जरिता वाठोर,शारदा राक्षे,आशा बनसोडे,छाया देशमुख, मुमताज शेख, फरीद शेख, निरंजन लोखंडे, सूशेन खरात व पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले होते.
नखाते म्हणाले की, ”पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वच फेरीवाल्यांना सामावून घेण्यासाठी व फेरीवाला कायद्याची अंमलबजावणी करण्याची गरज आहे. मात्र, आयुक्तांकडून त्याची अंमलबजावणी होत नाही. तत्कालीन आयुक्त राजेश पाटील यांनी विविध ठिकाणी झोनचे निर्मिती सुरू केली. आत्ताचे आयुक्त शेखर सिंह हे या कायद्याच्या अंमलबजावणीस टाळाटाळ करत आहेत. ज्या ठिकाणी हॉकर झोनची निर्मिती केली आहे. तिथे पाणी,वीज, स्वच्छता, व इतर सुविधा देण्यास अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ हे टाळाटाळ करत असून हा सर्वसामान्य विक्रेत्यावर अन्याय होत आहे. महापालिकेकडून सन 2012 /14 मध्ये झालेल्या सर्वेक्षणाच्या लोकांना जाणून-बुजून बायोमेट्रिक सर्वेक्षण पूर्ण केले जात नाही. सध्या सणाचे दिवस असल्यामुळे हातगाडी, स्टॉल धारकावरील कारवाई थाबंवणे गरजेचे आहे”.
मारुती भापकर म्हणाले की, ”हातगाडीवर व्यवसाय करून जगणाऱ्या लोकांकडे महापालिकेचे कायमच दुर्लक्ष झालेले आहे. पालिकेचे अधिकारी एसी मध्ये बसून काम करतात. त्यांना या लोकांच्या भावना काय समजणार ? अनेक वेळा शहरांमध्ये आंदोलन होतात आणि ते मार्गी लागण्यासाठी प्रयत्न केले जातात. मात्र, गोरगरिबांच्या या कायद्याकडे नेहमीच प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. यापुढेही अशीच परिस्थिती राहिली. तर, फेरीवाल्यांनी एकजुटीने मोठ्या प्रमाणात काम करावे लागेल”.