पिंपरी, दि. २० (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून फेरीवाला कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी सर्वेतोपरी पावले उचलले जातील. त्यासाठी फेरीवाल्यांचे लवकरच सर्वेक्षण , हॉकर्स झोन निश्चित आणि इतर बाबीसाठी प्रशासन अग्रेसर राहील, असे आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले.
शहर फेरीवाला समितीची आज (बुधवारी) बैठक झाली. यावेळी सहाय्यक आयुक्त प्रशांत जोशी, क्षेत्रीय अधिकारी अण्णा बोदडे, सिताराम बहूरे, सुचिता पानसरे, शितल वाकडे, प्रशासन अधिकारी मुकेश कोळप, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते, कविता खराडे, राजेंद्र वाघचौरे, संतोष जाधव, विजय शहापूरकर , बि.जी. कांबळे ,रमेश साळवे,मनीषा राऊत, डॉ.सरोज अंबिके, इरफान चौधरी,किरण सादेकर आदी उपस्थित होते.
बैठकी दरम्यान नखाते यांनी अर्बन स्ट्रीट पिंपरी- चिंचवड शहरामध्ये बनवण्यात येत आहेत. सुंदरतेच्या नावाखाली छोटे पदपथ रद्द करून मोठ्या प्रमाणात 14 ते 16 फुटाची पदपथ बनवण्यात येत आहे. सर्वसामान्य नागरिकांना त्याचा कसलाही कसलाही फायदा होत नाही. त्यामुळे रस्त्यावर ताण येत असून अर्बन स्ट्रीट मध्ये फेरीवाल्यांचा समावेश करून त्यांना सुंदर स्टॉलचे नियोजन करण्यात यावे.
तसेच फेरीवाला बायोमेट्रिक सर्वेक्षण चुकीच्या पद्धतीने होत असल्यामुळे संबंधित एजन्सीवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. महापालिकेचे अतिक्रमण कारवाई दरम्यान फेरीवाला प्रमाणपत्र धारक व सर्वेक्षण पात्र धारकावर कारवाई न करता त्यांना संरक्षण द्यावे. महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्सच्या गणवेशातील शिपायांकडून शिवीगाळ व मारहाण होत आहे. त्यांच्यावरही कारवाई करावी. हातगाडी,टपरी, स्टॉल संदर्भात लवकर निर्णय घेण्यासाठी महापालिकेमध्ये स्वतंत्र कार्यालय व कर्मचारी नेमण्यात यावी अशी मागणीही नखाते यांनी केली.