फूड ऑफिसर असल्याची बतावणी करून 25 हजारांची खंडणी घेणाऱ्यास अटक

0
55

घोटावडे, दि. 29 (पीसीबी) : फूड ऑफिसर असल्याची बतावणी करून स्विट होम दुकानदाराकडून 25 हजारांची खंडणी घेतली. याप्रकरणी भोसरी मधील एका सराईत गुन्हेगाराला पौड पोलिसांनी अटक केली. ही कारवाई सोमवारी (दि. 28) दुपारी मुळशी तालुक्यातील घोटावडे येथे करण्यात आली.

राजेंद्र मोहन पाटेकर (वय 58, रा. संत तुकारम नगर, भोसरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. अशोक वागपुरी गोस्वामी (वय 31, रा शेळकेवाडी घोटावडे ता मुळशी) यांनी पौड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी अशोक गोस्वामी यांचे घोटावडे मधील शेळकेवाडी फाटा येथे बधाई स्वीट होम हे दुकान आहे. सोमवारी दुपारी राजेंद्र पाटेकर हा गोस्वामी यांच्या दुकानात आला. त्याने तो फुड ऑफीसर असल्याची बतावणी केली. तुमच्या कारखान्याचा व्हिडिओ बनवला आहे त्यामुळे तुम्हाला सहा लाख रुपये दंड होऊ शकतो ही कारवाई टाळण्यासाठी 25000 रुपये द्या अशी खंडणी मागितली. त्याच्या सोबत आलेल्या कॅब चालकाच्या मोबाईल स्कॅनरवर 24 हजार रुपये ऑनलाईन घेतले. तर एक हजार रूपये रोख असे एकूण 25 हजार रुपयांची खंडणी घेतली.

पौड पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपी हा सराईत गुन्हेगार आहे. सरकारी अधिकारी असल्याची बतावणी करून फसवणूक व खंडणी घेतल्याचे त्याच्यावर सात पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत.