फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी आता नोटांवर झळकणार ?

0
279

विदेश,दि.२३(पीसीबी) – अलीकडेच पार पडलेल्या फिफा विश्वचषकाचा किताब अर्जेंटिनाच्या संघाने पटकावला. विश्वचषक जिंकल्यानंतर संघाचा स्टार खेळाडू लिओनेल मेस्सीच्या लोकप्रियतेत कमालीची वाढ झाली आहे. जगभरात मेस्सीचे चाहते मोठ्या प्रमाणात आहेत. विश्वचषकाची ट्रॉफी जिंकून मायदेशात गेलेल्या मेस्सी आणि त्याच्या संघाचे दणक्यात स्वागत करण्यात आले. ब्युनोस आयर्सच्या रस्त्यावर लाखो लोक मेस्सी ॲंड कंपनीच्या स्वागतासाठी जमले होते. मात्र आता येत असलेल्या बातम्यांनी सर्वांचे लक्ष वेधले आहे. अर्जेंटिनासरकार तेथील नोटांवर मेस्सीचा फोटो लावण्याच्या मनस्थितीत असल्याचे सांगितले जात आहे. 

अर्जेंटिना सरकारने आपली कल्पना अंमलात आणून तेथील नोटांवर मेस्सीचा फोटो लावला तर विश्वचषक जिंकल्यानंतर एखाद्या खेळाडूच्या फोटोला देशाच्या चलनावर स्थान मिळण्याची ही बहुधा पहिलीच वेळ असेल. विश्वचषकाच्या आनंदात देशाला सर्वात मोठा सन्मान किंवा सर्वात मोठा पुरस्कार मिळतो हे सर्वांनी पाहिले आहे, पण हा प्रकार पहिल्यांदाच पाहायला मिळणार आहे. 

दरम्यान, ही बाब अद्याप विचाराधीन आहे. पण, अर्जेंटिनाच्या सरकारी विभागातही याबाबत अनेक हालचाली सुरू झाल्या आहेत. तेथील सरकारने आणि खासकरून आर्थिक बाबी पाहणाऱ्यांनी विश्वचषकात मिळालेले यश पाहता याबाबत विचार सुरू केल्याचे वृत्त आहे. FIFA विश्वचषक 2022 च्या अंतिम फेरीत अर्जेंटिनाने फ्रान्सचा पराभव करून तिसऱ्यांदा विश्वचषक जिंकला. यापूर्वी त्यांनी 1978 आणि 1986 मध्ये हे विजेतेपद पटकावले होते. लक्षणीय बाब म्हणजे मेस्सीचे हे पहिलेच विश्वचषक विजेतेपद होते. मेस्सीच्या अर्जेंटिनाच्या संघाने 36 वर्षांचा दुष्काळ संपवून विश्वचषकाचा किताब पटकावला.