दि.०१(पीसीबी)-फिलीपींसला मंगळवारी 6.9 रिश्ट स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपामुळे फिलीपींसच्या अनेक भागात मोठं नुकसान झालं आहे. या नैसर्गिक आपत्तीत अनेक इमारती पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळल्या. आतापर्यंत हाती आलेल्या वृत्तानुसार 60 लोकांचा मृत्यू झाला आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे. भूकंपाचं केंद्र आणि प्रभावित क्षेत्रांबद्दल अजून पूर्ण माहिती हाती आलेली नाही. सुरुवातीच्या रिपोर्ट्समध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान आणि जिवीतहानी झाल्याची पृष्टी करण्यात आली आहे.
स्थानिक वेळेनुसार, दुपारनंतर अनेक भागात भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. त्यामुळे लोकांमध्ये भिती, घबराट पसरली. लोक पळतच आपल्या घराच्या व ऑफिसच्या बाहेर पडले. भूकंपाचे धक्के इतके तीव्र होते की, खासकरुन जुन्या रचना असलेल्या इमारती पूर्णपणे कोसळल्या. अनेक लोक ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. फिलीपींसमधील अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे.
फिलीपींसमधील आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने तात्काळ मदत आणि बचाव कार्य सुरु केलं आहे. ढिगाऱ्याखालून अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी बचाव पथकं दिवस-रात्र काम करत आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भिती आहे. कारण अजून अनेक लोक बेपत्ता आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. डॉक्टर, मेडीकल स्टाफ जखमींवर उपचार करुन त्यांची काळजी घेत आहे.
एका वरिष्ठ आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्याने सांगितलं की, 6.9 रिश्टर स्केल तीव्रतेचा हा भूकंप खूप शक्तीशाली होता. अनेक इमारती कोसळल्या. 60 लोकांचा मृत्यू झाला. प्रभावित क्षेत्रात मदत आणि बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरु आहे. वीज पुरवठा आणि कम्युनिकेशन सेवा काही भागात बाधित झाली आहे. त्यामुळे मदत आणि बचाव कार्यात अडचणी येत आहेत.












































