फसवणूक प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

0
764

चिखली, दि. २७ जुलै (पीसीबी) – प्लॉट घेण्यासाठी आलेल्या व्यक्तीने दहा टक्के रक्कम बुकिंगसाठी दिली. उर्वरित 90 टक्के रकमेसाठी बँकेकडून कर्ज घेण्यासाठी प्रकरण केले. मात्र त्यासाठी कागदपत्रे न देता प्लॉट विक्रेत्यांनी फसवणूक केली. हा प्रकार 14 नोव्हेंबर 2022 ते 26 जुलै 2023 या कालावधीत चिखली येथे घडला.

साई आनंद प्रोजेक्टचे संचालक शिवलिंग जरे, सागर अग्रवाल अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी रवींद्र संपत रोकडे (वय 45, रा. चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिखली येथे आरोपींनी साई आनंद प्रोजेक्ट नावाने प्लॉटिंग केले आहे. त्यातील एक प्लॉट फिर्यादी यांनी घेण्याचे ठरवले. त्या प्लॉटची किंमत 26 लाख रुपये अशी ठरली. त्याप्रमाणे बुकिंग रक्कम म्हणून प्लॉटच्या एकूण रकमेच्या दहा टक्के देण्याचे ठरले. त्यानुसार फिर्यादी यांनी दोन लाख 66 हजार रुपये आरोपींच्या बँक खात्यात जमा केले. उर्वरित 90 टक्के रक्कम बँकेकडून कर्ज स्वरूपात घेण्याचे ठरल्याने फिर्यादी यांनी कर्ज प्रकरणासाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे बँकेत जमा केली. मात्र बँकेकडून आरोपींना प्लॉटची मूळ कागदपत्रे सादर करण्याबाबत वेळोवेळी कळविले असताना आरोपींनी ती कागदपत्रे बँकेत जमा केली नाहीत. दरम्यान मुदतीत कागदपत्रे बँकेत जमा न केल्यामुळे फिर्यादी यांचे कर्ज प्रकरण नामंजूर झाले. यामध्ये फिर्यादी यांची फसवणूक झाली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.