फसवणूक प्रकरणी दोघांवर गुन्हा

0
463

भोसरी, दि. २८ (पीसीबी) – कंपनी विक्रीतून आलेले पैसे परस्पर बँक खात्यात जमा करून त्या रकमेचा गैरवापर केला. तसेच याबाबत पोलिसात तक्रार दिली असता डोक्याला पिस्तुल लाऊन तक्रार अर्ज मागे घेण्यास भाग पाडले. हा प्रकार एप्रिल 2011 ते 30 एप्रिल 2013 या कालावधीत एमआयडीसी भोसरी आणि शिवाजीराव भोसले बँक शिवाजीनगर पुणे येथे घडला.

हरबन्ससिंग सिंगारसिंग जब्बाल (वय 72, रा. प्राधिकरण, निगडी) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मंगलदार विठ्ठल बांगर (वय 47, रा. शिक्रापूर), रवींद्र गेणुभाऊ सातपुते (वय 50, रा. आकुर्डी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना त्यांच्या यापिशिका कंपनीच्या विक्रीपोटी मिळालेला एक कोटी 38 लाख रुपये रकमेचा चेक त्यांच्या सहमतीशिवाय आरोपींनी शिवाजीराव भोसले बँकेत याशिपिका कंपनीच्या खात्यात जमा केला. फिर्यादीच्या सहमतीशिवाय त्यांच्या सह्या घेऊन दोन चेकचा गैरवापर करून आरोपी आणि त्यांच्या मित्रांच्या कर्ज खात्यात ते पैसे वर्ग करून फिर्यादींची फसवणूक केली. याबाबत फिर्यादी यांनी खंडणी विरोधी पथक, पुणे शहर येथे तक्रार अर्ज केला. त्यांनतर आरोपींनी शिवाजीराव भोसले बँक येथे फिर्यादीच्या डोक्याला पिस्तुल लाऊन जीवे मारण्याची धमकी देत वाद मिटला आहे, असे सांगून तक्रार अर्ज मागे घेण्यास लावले असे फिर्यादीत म्हटले आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.