फसवणूक प्रकरणी चीटफंड कंपनीच्या संचालकांवर गुन्हा दाखल

0
256

पिंपरी, दि. ३ (पीसीबी) – लाखो रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी चिटफंड कंपनीच्या संचालकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार ऑगस्ट 2021 ते डिसेंबर 2021 या कालावधीत एफ एफ आय चिटफंड, मोरवाडी पिंपरी येथे घडला.

नटराज देवाप्पा कामत (वय 60, रा. पिंपरी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एफ एफ आय चिटफंटचे संचालक महिला (वय 42), व्यंकट साहेबराव उनवणे (वय 46), मॅनेजर महिला (वय 30, सर्व रा. मोरवाडी, पिंपरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगनमत करून फिर्यादी यांना मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केल्यास मोठ्या प्रमाणावर नफा देऊ असे आमिष दाखवले. त्यावर विश्वास ठेऊन फिर्यादी यांनी आजवर 71 लाख 24 हजार 931 रुपयांची गुंतवणूक केली. त्यावर परतावा म्हणून 16 लाख 35 हजार 69 रुपये अशी एकूण 87 लाख 60 हजार रुपये रक्कम फिर्यादी यांना मिळणार होती. ही रक्कम आरोपींनी फिर्यादी यांचा विश्वासघात करून स्वतःच्या फायद्यासाठी वापरली. आरोपींनी फिर्यादीसह इतर ठेवीदारांचे पैसे स्वतःसाठी वापरले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.