पुणे, दि. १० (पीसीबी) – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्यातील भाजपच्या टार्गेटवर आहेत. त्यांना लवकरच राज्याच्या राजकारणातून आऊट केले जाईल, असा गौप्यस्फोट शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी शुक्रवारी (दि. ९) पुण्यात केला.राज्यातील परिस्थिती अस्थिर करण्याचे काम गृह खात्याकडून होत आहे. राज्यातील राजकारणाला जातीय रुप देऊन तसेच राजकारणात जातीपातीचं विष कालवण्याचं काम हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्याचा गंभीर आरोपही यावेळी अंधारे यांनी केला. आता असलेल्या काही पोलिसांवर खरंच ईडी कारवाई करण्याची गरज आहे. आमचं सरकार येऊ द्या, असा इशाराही त्यांनी दिला.
अंधारे म्हणाल्या, ‘‘हे आता स्वत:ला कितीही लाडके लाडके म्हणत असतील तरी जनतेच्या मनात हे तिन्ही लोक आता दोडके झाले आहेत. हे मतांची कडकी झाले आहेत, म्हणून लाडके लाडके करत आहेत, हे जनतेला माहिती आहे. पण ते आता लाडके राहणार नाहीत. लोक तुम्हाला धडकी भरवतील. राज्यात जाती-पातीचं विष कालवायचं काम देवेंद्र फडणवीस यांनी केले. आता त्यांची माणसं हे काम करत आहेत.’’
भाजपने एक गलिच्छ रॅप प्रसिद्ध केला आहे. तो इतका गलिच्छ आहे. त्या रॅपमध्ये इंदिरा गांधी, पंडित नेहरु यांचा फोटो वापरला आहे. मला यांच्या राजकारणाची कीव येते. महाविकास आघाडी राज्यात एक मोट बांधत आहे. महायुतीकडून राज्याला रुग्ण अवस्थेत नेण्याचा प्रयत्न झाला आहे. त्यामुळे आता राज्याला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करावा लागेल आणि महाविकास आघाडी म्हणून तो प्रयत्न करु, असे सुषमा अंधारे म्हणाल्या.
राज्याच्या मंत्रिमंडळावर सडकून टीका
अंधारे म्हणाल्या- पुण्यातील आरोग्य व्यवस्थेचे यांनी वाटोळं करून ठेवलं आहे. ससूनमध्ये रक्त बदलतात, किडनी बदलतात, हे वाईट आहे. रुग्णालयात ड्रग्सचं रॅकेट सापडत आहे, हे खूप दुर्देवी आहे. आरोग्यमंत्री भारी माणूस आहेत, एखादा आजार पाण्यामुळे होतो का डासांमुळे हेच त्यांना कळत नाही. ज्या माणसाकडे राज्य उत्पादन शुल्क विभाग आहे, तो बाबा विधानभवनात तंबाखू खातो. ज्याला कृषीमंत्री केलं त्याला शेतीतलं काहीही कळत नाही, त्यामुळे आपल्या राज्याचे मंत्रिमंडळ लय भारी आहे, अशा शब्दांत अंधारे यांनी राज्याच्या मंत्रिमंडळावर सडकून टीका केली.