फडणवीस यांची नवी खेळी, बारामती मतदासंघाची जबाबदारी राम शिंदे यांच्याकडे

0
359

बारामती, दि. १७ (पीसीबी) – राज्यातील 2019च्या विधानसभा निवडणुकीपासून युवा आमदार रोहित पवार व भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राम शिंदे यांच्यात सत्तासंघर्ष सुरू आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते यांनी मोठी राजकीय खेळी करत राम शिंदे यांना विधानपरिषदेच्या तिकीटा बरोबरच बारामती लोकसभा मतदार संघातील भाजपचे प्रभारी म्हणून नियुक्त केले आहे. त्यामुळे हा सत्तासंघर्ष आगामी काळात अधिक वाढणार असल्याची चिन्हे आहेत.

राम शिंदे हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे माहेरकडील नऊवे वंशज असल्याचे सांगितले जाते. ते धनगर समाजाचे नेते आहेत. तसेच ते देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील समजले आहेत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना शिंदे याच्याकडे जलसंधारण सह 12 खात्यांचे मंत्रीपद होते. मात्र 2019मध्ये कर्जत-जामखेड मतदार संघातून युवा नेते रोहित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवत राम शिंदे यांचा पराभव केला. शिवाय यंदाच्या वर्षाच्या सुरवातीलाच भाजपच्या ताब्यातील कर्जत नगरपालिकाही निवडणुकीत जिंकली.

कर्जत नगरपालिका निवडणूक व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची नुकतीच झालेली जयंती यांच्यात पवार-शिंदे संघर्ष पहायला मिळाला. राम शिंदे यांना रोहित पवार यांच्या विरोधात ताकद देण्यासाठी त्यांना विधानपरिषदेत आमदार करण्याची मागणी भाजपचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव कर्डिलेंसह स्थानिक भाजप नेते व कार्यकर्त्यांनी केली होती. त्यानुसार त्यांना विधानपरिषदेची उमेदवारी देण्यात आली आहे.

बारामती लोकसभा मतदार संघात धनगर समाज मोठ्या संख्येत आहे. ही बाब लक्षात घेता फडणवीस यांनी राम शिंदे यांना बारामती लोकसभा मतदार संघातील भाजपचे प्रभारी म्हणून नियुक्त केले आहे. राम शिंदे यांच्या विधानसभा मतदार संघाला लागूनच बारामती लोकसभा मतदार संघ आहे. मागील काही निवडणुकीत आमदार गोपीचंद पडळकर यांनीही बारामती लोकसभा मतदार संघात प्रयत्न करून पाहिले मात्र त्यांना यश आले नव्हते. बारामती परिसरावर पवार कुटुंबाचे मागील 50 वर्षांपासून वर्चस्व राहिले आहे. रोहित पवार यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीला बारामती परिसरातूनच जिल्हा परिषद निवडणूक जिंकून सुरवात केली होती. या लोकसभा मतदार संघातून शरद पवार यांच्या कन्या महिला नेत्या सुप्रिया सुळे या खासदार आहेत.

राम शिंदे हे धनगर समाजाचे सुशिक्षित नेतृत्त्व समजले जातात. त्यामुळे युवा वर्गात त्यांच्या बाबत आकर्षण आहे. मात्र राम शिंदे पवारांच्या वर्चस्व असलेल्या बारामती मतदार संघात किती प्रभाव गाजविणार हा चर्चेचा विषय ठरत आहे.