फडणवीस, बावनकुळे यांच्या नंतर आता अमित शाह भेटणार राज ठाकरे यांना ?

0
223

मुंबई, दि. २२ (पीसीबी) : महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी येत आहे. केंद्रीय गृहमंत्री व भाजपचे राजकीय चाणक्य म्हणून ओळखले जाणारे अमित शाह मुंबईच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्या दरम्यानच मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि अमित शाह यांच्यात भेट होण्याची शक्यता आहे. अमित शाह हे लवकरच मुंबई दौरा करणार आहेत. नुकतंच काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यात भेट झाली होती. या लगोलग भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही राज ठाकरेंची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. यानंतर आता अमित शाह आणि राज ठाकरे यांच्या भेटीची शक्यता व्यक्त होत आहे. मुंबई महापालिका निवडणुकीआधी भाजप – मनसे अशा नव्या राजकीय समीकरणाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

एकीकडे राज ठाकरे आणि भाजप नेत्यांच्या भेटीगाठी होत असतानाच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही काल राज ठाकरे यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी शिवतीर्थ येथे गणपतीचं दर्शन घेतले. शिवसेना आणि भाजपमधील युती संपुष्टात आल्यानंतर राज ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्दा आक्रमकपणे पक्षाच्या अजेंड्यात रोवला. पक्षाचा झेंडा बदलून ‘संपूर्ण भगवा’ केला. एकनाथ शिंदे गटासोबत भाजपने सरकार स्थापन केल्यानंतर मनसे-भाजपमध्ये राजकीय सूत जुळताना दिसत आहे. मनसे आणि भाजपची युती होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
मुंबई महापालिका निवडणुका जवळ येऊन ठेपलेल्या आहेत. मनसे आणि भाजप असे राजकीय समीकरण जुळून आल्यास हिंदुत्वादी मते युतीच्या बाजूने एकत्रित होऊन त्यामुळे भाजपला मुंबईत फायदा होईल तर शिवसेनेला याचा जबर फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.