फडणवीस आणि धनंजय मुंडेंमध्ये झाली मध्यरात्री खलबतं

0
400

मुंबई दि. 1 (पीसीबी)- गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारणात चक्रावणाऱ्या आणि धक्कादायक गोष्टींची मालिका सुरु असतानाच आता त्यामध्ये आणखी एका गोष्टीची भर पडली आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरुद्ध पुकारलेल्या बंडामुळे राज्यात सत्तापालट झाला होता. शिवसेनेत  उभी फूट पडली होती. या सगळ्यानंतर आश्चर्याचा धक्का म्हणजे भाजपने एकनाथ शिंदे  यांना मुख्यमंत्रिपद देऊ केले होते. यानंतरही धक्कादायक घटनांची मालिका थांबेल असे वाटले होते. मात्र, त्यानंतर काही तासांतच आणखी एक धक्कादायक घडामोड घडल्याची माहिती समोर आली आहे. काल रात्री एकनाथ शिंदे यांचा शपथविधी आटोपल्यानंतर सागर बंगल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे  आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाल्याचे समजते. या भेटीबाबत अत्यंत गुप्तता बाळगण्यात आली होती. मात्र, आज सकाळी ही माहिती बाहेर आली आहे.

 ‘फडणवीसांना उपमुख्यमंत्रीच व्हायचे होते तर अडीच वर्षांपूर्वी नकार का दिला?’; ‘सामना’तून शिवसेनेचा सवाल
सूत्रांच्या माहितीनुसार, धनंजय मुंडे हे गुरुवारी रात्री साडेबाराच्या सुमारास देवेंद्र फडणीवस यांच्या सागर बंगल्यावर गेले होते. याठिकाणी फडणवीस आणि धनंजय मुंडे यांच्यात साधारण अर्धा तास चर्चा झाली. त्यानंतर धनंजय मुंडे हे सागर बंगल्यातून बाहेर पडले. ही भेट नेमकी कोणत्या कारणासाठी झाली, हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. परंतु, सध्याची अस्थिर राजकीय परिस्थिती पाहता धनंजय मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीविषयी अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. धनंजय मुंडे हे अजित पवार यांच्या गटातील मानले जातात. २०१९ मध्ये अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी राजभवनावर शपथ घेतली होती तेव्हादेखील धनंजय मुंडे हे अजित पवारांच्या गटात होते. त्यामुळे आतादेखील काही नवीन राजकीय समीकरणांची नांदी होऊ घातली आहे का, याची उत्सुकता अनेकांना लागली आहे.

राज्यातील गेल्या काही तासांमधील राजकारणावर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नव्हती. त्यांना कोरोना झाल्यामुळे ते सध्या इतरांपासून अंतर राखून आहेत. मात्र, त्यांच्या मर्जीतील असलेले धनंजय मुंडे आता फडणवीसांना भेटल्याने आगामी काळात आणखी नव्या राजकीय घडामोडी पाहायला मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.