फडणवीससाहेब, तुम्हीच उपमुख्यमंत्री, तुम्हीच गृहमंत्री… तुम्हाला भिती का वाटावी?

0
111
  • मधुकर भावे

१७ मे २०२४ रोजी महाराष्ट्राचे गृहमंत्री श्री. देवेंद्र फडणवीससाहेब यांची मुलाखत एका वृत्तपत्रात हेडलाईन करून प्रसिद्ध झालेली आहे. ही संपूर्ण मुलाखत वाचल्यानंतर, या देशाचा एक नागरिक म्हणून, पत्रकार म्हणून, श्री. फडणवीस साहेबांना काही प्रश्न विचारणे अत्यंत आवश्यक आहे.श्री.फडणवीस यांनी मुलाखतीत जाहीर केले आहे की, ‘निवडणुकीनंतर सामाजिक सलोखा बिघडण्याची त्यांना चिंता वाटते आहे.’ त्याच मुलाखतीत त्यांनी असेही स्पष्ट केले आहे की, ‘कायदा आणि सुव्यवस्थे’ला धोका निर्माण होण्याची भीती मला वाटते आहे. सामाजिक सलोखा टिकवण्यासाठी जागरूक राहण्याची गरज आहे’, अशीही भूमिका त्यांनी मांडली आहे.

बाकी या मुलाखतीत त्यांनी जे काही मुद्दे मांडले आहेत त्यात अनेक विरोधाभास आहेत.खुद्द राज्याच्या गृहमंत्र्याला निवडणूक निकालानंतर सामाजिक सलोखा बिघडण्याची ‘चिंता’ किंवा ‘भीती’ वाटत असेल तर, ती बाब सामान्य नागरिकांच्या दृष्टीने अतिशय गंभीर आहे. निवडणूक निकालाला अद्याप १६ दिवस आहेत. ४ जून रोजी निकाल लागणार आहेत. त्या अगोरदर १५ दिवस राज्याच्या मुख्यमंत्र्याला कायदा-सुव्यवस्थेला धोका निर्माण होण्याची भीती वाटत असेल तर ती कोणामुळे वाटते आहे, त्याची कारणे त्यांना नक्की समजली असतील. कारण, ग्रहमंत्र्याकडे गृहखात्याकडून यासंबंधीची वेळोवेळी माहिती देण्याची व्यवस्था असते. हे गेली ६०-६५ वर्षे तरी मला माहीत आहे. यशवंतराव चव्हाण गृहमंत्री असल्यापासून ‘एस.बी.१’ मार्फत रोज सकाळी राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना त्या-त्या दिवशी आणि आदल्या रात्री राज्यात जे काही ‘खुट्ट’ झालेले आहे, त्याची तपशीलवार माहिती कळवली जात असते. त्यामुळे कायदा-सुव्यवस्था बिघवडणारे कोण आहेत, याची माहिती फडणवीस यांना असणारच. असे असताना निवडणुकीच्या प्रचारात मुलाखत देताना फडणवीसांनी सामाजिक सलोखा बिघडण्याची जी चिंता व्यक्त केली आहे, तो विरोधाभास आहे. अशी भीती किंवा चिंता राज्यातील सामान्य नागरिकांना वाटली तर ते समजू शकते. पण राज्याच्या गृहमंत्र्यालाच जर ‘भीती’ आणि ‘चिंता’ वाटते तर, महाराष्ट्रातील सामान्य माणसांनी काय करायचे? मग हा सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्यांवर करावयाचा बंदोबस्त कोणी करायचा? श्री. फडणवीस यांनी याच मुलाखतीमध्ये काही विरोधाभासही व्यक्त केले आहेत. फडणवीस म्हणतात की, ‘लोकसभा निवडणुकीत भाजपाला अभूतपूर्व यश मिळणार, हे निश्चित आहे…’ या वाक्यातील ‘अभूतपूर्व’ या शब्दाचा अर्थ असा की, ‘यापूर्वी कधीही मिळाले नाही, एवढे यश’ यावेळी मिळेल. २०१४ साली लोकसभा निवडणुकीत भाजपाला २३ जागा मिळाल्या होत्या. आणि शिवसेनेला १८ मिळाल्या होत्या. तेव्हा दोघांची युती होते. युतीकडे ४१ जागा होत्या.

२०१९ च्या निवडणुकीत पुन्हा तेच आकडे कायम राहिले. आता शिवसेनेचा जो मुख्य प्रवाह आहे म्हणजे उद्धव ठाकरे यांची शिवसेना. यांच्यासोबत भाजपाची युती नाही. शिंदेच्या शिवसेनेसोबत युती आहे. तशी ती युती विजय मिळवण्यास कमी पडेल म्हणून राष्ट्रवादी पक्षही फोडून अजितदादांना वेगळे काढण्यात आले. ‘त्यांच्यावर सिंचन घोटाळ्याचे आम्ही आरोप केले होते,’ हेही फडणवीसांनी कबूल केले आहे. पण, नंतर त्यांचा त्यात संबंध नाही, असे स्पष्ट झाले,’ असेही सांगून टाकले आहे. २०१० आणि २०१४ या दोन वर्षांत फडणवीसांनी केलेल्या आरोपांत तथ्य नाही, असे त्यांना २०२४ साली लक्षात आले! त्याचा दुसरा अर्थ की, एक तर फडणवीसांकडून झालेले आरोप बेजबाबदारपणाचे होते. माहिती न घेता कलेले होते असा होतो. किंवा अजितदादा भाजपाला सामील झाल्यानंतर पुरावे दिसेनासे झाले, असेही होऊ शकते. यात नेमके काय झाले, हे फडणवीसांनी काही सांगण्यापेक्षा लोकांना सगळे कळलेले आहे आणि आता फडणवीस यांची खात्री आहे की,

५१ टक्के मतांची भाजपाला खात्री नसल्यामुळेच त्यांनी शिंदे, अजितदादा यांच्याशी युती केलेली आहे. त्यातूनच २०२४ च्या निवडणुकीत भाजपाला ‘अभूतपूर्व’ यश मिळणार असे फडणवीस सांगत आहेत. हे सांगत असताना त्यांना सामाजिक सलोखा बिघडण्याची चिंता अाणि भितीही वाटत आहे. जर, अभूतपूर्व यश मिळणार आहे… म्हणजेच महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे. तुम्हीच गृहमंत्री आहात… तुमचाच मुख्यमंत्री आहे… मग तुम्हाला भीती कशाची वाटते आहे,? हा सामान्य माणसांचा प्रश्न आहे. उलट महाराष्ट्रात असे सामाजिक सलोखा बिघडव्याचे वातावरण असेल तर तसे आम्ही होऊ देणार नाही. सामाजिक सलोगा टिकवूच… हे गृहमंत्र्यांनी ठामपणे सांगायला हवे. गृहमंत्र्यालाच भीती आणि चिंता वाटू लागली तर महाराष्ट्राने काय करायचे? चौकीदारच घाबरला आहे, असे असेल तर दुसरा पहारेकरी कोण आणायचा… फडणवीस साहेब, आणखी एक गोष्ट लक्षात घ्या… तुमच्या अभूतपूर्व यशाचा आकडा तुम्ही सांगत नाही. देश पातळीवर ‘चारसौ पार’ अशी तुमची घोषणा आहे… त्यात महाराष्ट्रात िकती? तो आकडा तुम्ही सांगत नाही. आणि ‘अभूतपूर्व यश मिळणार’ असे सांगत असताना तुम्हाला भीती आणि चिंता दोन्हीही वाटते आहे. अशावेळी तुम्ही तब्बेतीची काळजी घेणे आवश्यक आहे. राज्याच्या गृहमंत्र्याला भीती वाटणे हे लक्षण चांगले नाही. चिंता समजू शकते पण, त्यावर उपाय आहेत. समाज विघातक कृत्य करणारे कोण? हे तुमच्या पोलीस यंत्रणेला बरोबर माहीती असते. मुंबई, महाराष्ट्राच्या पोलीस दलाचा लौकीक देशातच नाही तर जगात आहे. त्यांच्यावर कसलाही दबाव नसेल तर महाराष्ट्र संपूर्ण सुरक्षित ठेवण्याची ताकद या पोलीस दलात आहे. घाटकोपर येथील होर्डींग पडल्यावर दोन दिवसांत संबंधित आरोपीला उदयपूरला जाऊन याच पोलिस यंत्रणेने बेड्या घातल्या की नाही? या पोलीस यंत्रणेवर कमालीचा ताण निवडणूक काळात आहे. असे गृहमंत्र्यांनी म्हणायला हवे होते. आणि खरोखरच कमालीचा ताण आहे. त्यांना नाराजी व्यक्त करता येत नाही. किती अतीश्रम होताहेत, हेही सांगता येत नाही. सगळ्याच पक्षांचे रोड शो… त्याला बंदोबस्त.. देशाचे पंतप्रधान येणार… त्यासाठी आवश्यक ती सुरक्षा… ते सगळे आवश्यकच आहे… हे सर्व होत असतानाच होर्डिंग कोसळले तर तिथला बंदोबस्तही पोलिसांच्याच डोक्यावर आहे. तेव्हा गृहमंत्र्याची जबाबदारी आहे की, आपल्या यंत्रणेला त्यांनी संभ्रमात टाकता कामा नये. जर गृहमंत्रीच ‘भीती’ आणि ‘चिंते’ची गोष्ट करू लागला तर त्यांची यंत्रणाच आता काय करायचे? असे विचारत राहिल. फडणवीसांनी भीती वाटून घेवू नये. निवडणुका येतील अणि जातील. आजपर्यंत अनेक निवडणुका आल्या नी गेल्या. सामाजिक सलोखा कधीही बिघडलेला नाही. अगदी इंिदरा गांधी यांनी १९७७ सालचा पराभवही लोकशाही तत्त्वानेच स्वीकारला… पचवला… गेल्या दोन निवडणुकांत भाजपाला दणदणीत विजय मिळाला. त्या निकालानंतर सामाजिक सलोखा बिघडला नाही. विरोधकांनी पराभव स्वीकारला. आता तुम्ही म्हणता, आम्हाला अभूतपूर्व यश मिळणार आहे. म्हणजे महाराष्ट्रातील विरोधक पराभूत होणार आहेत. गेल्या दोन निवडणुकांनंतर सामाजिक सलोखा टिकलाच होता… मग आता ‘अभूतपूर्व यशाची खात्री’ असताना तुम्हाला भीती का वाटावी?

१९५२ पासूनच्या सर्व निवडणुकीत कोणत्याही गृहमंत्र्याने निवडणूक निकालानंतर सामाजिक सलोखा बिघडण्याची चिंता किंवा भीती व्यक्त केलेली नव्हती. उलट हाच समाजिक सलोखा टिकवण्याची जबबादारी फडणवीस साहेब तुमच्यावरच आहे. कायदयाने तुमच्यावर आहे. ती तुम्ही टाळू शकत नाही. जर तुम्हाला एवढी ‘भीती’ वाटत आहे, तर त्यावर ताबडतोब उपाय योजा. समाज विघातक शक्ती नेमक्या कोणत्या आहेत, हे पलिसांना बरोबर माहिती असते. अनेक निवडणुकांमध्ये अशा शक्तींना आगोदर ‘बंद’ केले जाते. वातावणरणात तणाव निर्माण होणार नाही, याची काळजी घेतली जाते. या शिवाय सर्व सामाजिक नेत्यांना आवाहन करून शांतता आणि सलोखा टिकवण्याची भूमिका गृहमत्री म्हणून फडणवीसांनाच घ्यावी लागेल. अशा भूमिकेला कोणीही विरोध करू शकणार नाही. कारण ‘सामाजिक सलोखा टिकलाच पाहिजे.’ यात कोणाचेही दुमत नाही. आणि आजपर्यंत तो टिकलेलाच आहे.उलट या निवडणूक प्रचाारत अनेक नेते किती टोकाची भाषणे करत होते. या प्रचारसभांमध्ये ‘विचार’ कुठेच नव्हता. सर्व पक्षांच्या नेत्यांची भाषणे काढून तपासली तर हे स्पष्ट होईल की, यात अरे-तुरे जास्त आणि ‘विचार’ कमी. अशा या सभा होत्या.

फडणवीसांनी शिंदे आणि दादा गटाच्या फुटीचे समर्थन करून श्री. शरद पवार यांच्या पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय ताकतीची कबुली दिलेली आहे. पण भाजपाच्या अभूतपूर्व यशाचा आकडा सांगितलेला नाही. भाजपाला एकटे पाडले जात आहे, असाही एक विचित्र मु्द्दा फडणवीसांनी मांडला आहे. संपूर्ण मुलाखतीत ते भांबावलेले दिसतात. त्यामुळे अजित पवार यांच्यावरील आरोपांवर बोलताना त्यांनी जे काही सांगितले, त्याचा शेवट ‘तपास यंत्रणेला काही आढळून आले नाही,’ असा आहे. आणि तिकडे शिंदे गटात गेलेले रविंद्र वायकर यांनी एका शब्दात या फोडाफोडीचे सूत्रच सांगून टाकले. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले पाहिजे. एवढे तरी ते खरे बोलले, हे काही कमी नाही. वायकर यांचे वाक्य असे आहे की,
‘माझ्यासमोर दोनच पर्याय होते…
एकतर पक्षबदल किंवा तुरुंग’

त्यामुळे फडणवीसांच्या मुलाखतीचे सगळे सार वायकरांच्या एका वाक्यात आहे. एवढे सगळे झाल्यावर फडणवीस म्हणतात की, ‘आम्हाला अभूतपूर्व यश मिळणार आहे…’ आणि तरीसुद्धा फडणवीस यांना भीती वाटते… चिंता वाटते. या दोन गोष्टी सुसंगत वाटत नाहीत. त्यामुळे मुलाखतीत फडणवीस भांबावल्यासारखे वाटतात. शरद पवार आजही मात्तब्बर नेते आहेत हे ते कबूल करतात याबद्दलही त्यांचे आभारच मानले पाहिजेत. परंतु त्यांचेच पंतप्रधान पवारसाहेबांबद्दल काय बोलले… तेही गोंळलेलेच दिसत आहेत. पंतप्रधान आणि अमित शहा यांच्या वाढलेल्या सभांबद्दल फडणवीसांनी केलेले विश्लेषण मुद्देसूद वाटत नाही. ‘मित्रपक्षांसाठी मोदीसाहेबांचच्या जास्त सभा झाल्या.’, असे त्यांचे समर्थन आहे. गेल्यावेळी मित्रपक्ष होतेच की! मतदारसंघाची संख्या ४८ एवढीच हाेती! फरक काहीच झालेला नाही. मग सभा वाढल्या… रोड शो वाढले… हे का वाढले, हेही लोकांना समजते आहे. पण या रोड शो चा उलटा परिणाम झालेला आहे. हे फडणवीसांच्या लक्षात आलेले दिसत नाही. घाटकोपरचे १४० फुटांचे होर्डींग कोसळून त्याखाली १५-२० माणसे मृत्युमुखी पडली. अनेक जखमी रुगणालयात होते. त्यांना भेटायला जाण्याची कोणालाही आठवण झाली नाही. त्याची चर्चा लोकांमध्ये आहे. वाहतूक कोंडीचा झालेला त्रास हा फडणवीस यांनी जमेत धरलेला नाही. तेव्हा ‘रोड शो किती उपयोगी ठरला’ याची चिंता फडणवीसांनी केली असती तर समजू शकले असते.

तरीही फडणवीसांचे म्हणणे असे आहे की, ‘आम्हाला अभूतपूर्व यश मिळणार आहे…’ त्यांच्या पक्षातर्फे ४८ पैकी ४१ जागा जिंकणार, असे काहीजण सांगतात… ४५ जागा जिंकणार, असे बावनकुळे हे सांगतात… खरं म्हणजे ४ जूनपर्यंत या मंडळींनी ‘आम्ही महाराष्ट्रात ४८ जागा जिंकणार’ असेच सांगायला हवे. फडणवीसांना ते संस्कृत सुभाषित माहितीच असेल… ‘वचने किंम ् दरिद्रता…’ तेव्हा अभूतपूर्व यश मिळणार असताना आणि फडणवीस गृहमंत्री असताना भिती बाळगावी, चिंता करावी, हा सगळा विरोधाभास वाटतो. फडवीसांना तो शोभणारा नाही. एवढे यश तुम्हाला मिळणार अाहे तर मग कशाला घाबरता? आणि चिंता कशाची करता?

आणि आात शेवटचे एवढेच की, निवडणूक निकालानंतर सामाजिक सलोखा बिघडवण्याच्या घटना घडल्या तर त्याची जबाबदारी फडणवीसांवर येईल. कारण आधी त्यांना त्याचा अंदाज आला आहे. त्याचवेळी ही गोष्ट स्पष्ट करतो की, विरोधी पक्षाच्या सर्व नेत्यांनी… निकाल कोणताही लागो… महाराष्ट्रात सामाजिक सलोखा टिकवण्याची जबाबदारी आपल्यावरही आहे, याचेही भान ठेवावे. पवारसाहेबांना त्याची पूर्ण जाणीव आहे. कारण निवडणुका येतात आिण जातात. पण, निवडणूक निकाल लागल्यानंतरही सर्वांना इथेच सामोपचाराने रहायचे अाहे. एकतर फडणवीस यांनी काल्पनिक भय निर्माण करू नये. आणि जर त्यांच्याकडे तशी माहिती असेल तर, गृहमंत्री म्हणून त्याचा बंदाेबस्त आतापासून करावा. चिंता करून िकंवा भीती व्यक्त करून काय होणार? गृहमंत्री भितोय, हे चित्रच कसे भयंकर वाटते. खरं ना….

पण खरी गोष्ट अशी आहे की, फडणवीसांना चिंता वेगळीच आहे. देशात काय होईल याबद्दल मी सांगत नाही. कारण मी देशात फिरलो नाही. फडणवीसांची भीती त्याचकरिता आहे की, या निवडणुकीत संपूर्ण भारतात भाजपाला जो सगळ्यात मोठा दणका बसेल तो महाराष्ट्रातच बसेल. कदाचित फडणवीसांची तीच ‘भीती’ आणि ‘चिंता’ असेल! ते काहीही असले तरी, कोणीही निवडणूका जिंकल्या तरी किंवा कोणीही हरले तरी महाराष्ट्रातील सामाजिक सलोखा सगळ्यांनाच टिकवायचा आहे. ही गोष्ट कायमची लक्षात ठेवली पाहिजे.
सध्या एवढेच
📞9869239977