प्रेयसीला फिरविण्यासाठी त्याने चोरली 15 वाहने; प्रियकराला अटक

0
380

पिंपरी दि. १७(पीसीबी) -एका प्रियकराने आपल्या प्रेयसीला फिरविण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातून तब्बल 15 वाहने चोरली. निगडी पोलिसांनी या चोरट्याला अटक केली आहे. यश किरण सोळसे (वय 20, रा. एमआयडीसी रोड, तळेगाव दाभाडे) असे त्या चोरट्याचे नाव आहे.

शहरात रात्रीच्या वेळी विनाकारण फिरणा-यांना अचानकपणे चेक करण्याच्या सूचना पोलीस आयुक्तांनी दिल्या होत्या त्यानुसार बुधवारी (दि. 13) रात्री ट्रान्सपोर्ट नगर, निगडी येथे एक कार संशयितपणे विनाकारण फिरत असल्याचे निगडी पोलिसांना आढळले. त्यामुळे पोलिसांनी चालकाला हटकले असता तो पळून जाऊ लागला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने ती कार प्राधिकरण निगडी येथून चोरल्याचे सांगितले.

त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने निगडी, सांगवी, पिंपरी, देहूरोड, तळेगाव दाभाडे परिसरातून दोन कार आणि 13 दुचाकी वाहने चोरल्याचे सांगितले. पोलिसांनी तीन लाख 45 हजार रुपये किमतीची वाहने जप्त केली. आरोपी यश याने त्याच्या प्रेयसीला फिरविण्यासाठी ही वाहने चोरी केल्याचे पोलिसांना सांगितले आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंगनाथ उंडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विश्वजित खुळे, सहाय्यक निरीक्षक अमोल कोरडे, कर्मचारी सुधाकर अवताडे, सतीश ढोले, दत्तात्रय शिंदे, विलास केकाण, शंकर बांगर, विनोद व्होनमाने, सोमनाथ दिवटे, विजय बोडके, भूपेंद्र चौधरी, राहुल गायकवाड, तुषार गेंगजे, राहुल मिसाळ यांच्या पथकाने केली.