प्रेमात लोक वेडे होतात हे आपण कथा-कादंबऱ्यात, चित्रपटातून नेहमी ऐकत असतो किंवा पाहत असतो. मात्र, ही केवळ बोलण्याची किंवा उपमा देण्याची पद्धत नसून असे खरोखर होण्याची शक्यता चीनमधील डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. चीनमध्ये एका तरुणीला ‘लव्ह ब्रेन’ (love brain)नावाचा आजार झाल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. प्रेमाने आंधळी झालेल्या या तरुणीने आपल्या प्रियकराला एवढा त्रास दिला, की त्याला पोलिसांमध्ये तक्रार करावी लागली. या तरुणीने आपल्या प्रियकराला एक दिवशी फोन केला होता. मात्र, त्याने फोन उचलला नाही तेव्हा घाबरलेल्या किंवा असुरक्षेच्या भावनेने तिने तब्बल १०० हून अधिक वेळा त्याला फोन आणि मेसेज केले. त्यानंतरही त्याने प्रतिसाद दिला नाही तेव्हा तिने घरातील सामानाची तोडफोड सुरू केली. तसेच बाल्कनीमधून उडी मारण्याची धमकीही देऊ लागली. यानंतर या तरुणाने पोलिसांना पाचारण केले.
साउथ चायना मॉर्निंग पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार या तरुणीचं नाव जिया ओयू अस आहे. पोलिसांनी तिची मानसिक स्थिती पाहून तिला डॉक्टरांकडे नेलं. डॉक्टरांनी सांगितलं, की या तरुणीला बॉर्डरलाईन पर्सनॅलिटी डिसऑर्डर हा आजार झाला आहे. साध्या भाषेत याला लव्ह ब्रेन असे म्हटलं जातं.
डॉक्टरांनी सांगितलं, की जिया ओयू ही कॉलेजच्या दिवसांपासूनच अशा प्रकारे वर्तन करत होती. पहिल्या वर्षात शिकत असतानाच ती आपल्या प्रियकराकडे खूप आकर्षित झाली होती. अगदी छोट्या-छोट्या गोष्टी ती त्याच्यासोबत शेअर करत होती. तसंच, तो कुठे आहे, काय करतो आहे हे जाणून घेण्यासाठी ती दिवसातून शेकडो वेळा त्याला कॉल आणि मेसेज करत होती.
यामुळे आता लव्ह ब्रेन ही काही मेडिकल टर्म आहे असे म्हणता येणार नाही. जेव्हा प्रेमी युगलांमधील एकमेंकांविषयी असणारे आकर्षण धोकादायक स्तरावर जातो, तेव्हा त्याला लव्ह ब्रेन म्हटलं जाऊ शकतं. सध्या चीनमधील या तरुणीवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. तेथील डॉ. डू ना यांनी सांगितले की, चिंता, तणाव आणि इतर कारणांमुळे हा आजार होऊ शकतो. तसंच ज्यांचे लहानपणी आई-वडिलांशी नीट संबंध नव्हते, त्या व्यक्तींना याचा सर्वाधिक धोका असतो असेही डॉक्टरांनी स्पष्ट केलं.