प्रेयसीला कारखाली चिरडलं, मित्रांच्या मदतीने जीवे मारण्याचा प्रयत्न

0
554

ठाणे, दि. १७ (पीसीबी) – प्रेयसीला कारने धडक देऊन गंभीर जखमी केल्याप्रकरणी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड यांचा मुलगा अश्वजित गायकवाड याच्यासह तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अश्वजित गायकवाडने 26 वर्षीय प्रिया सिंग हिच्यावर प्राणघातक हल्ला केल्याचा आणि गाडीने तिला चिरडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. प्रियाने तिच्या इंन्स्टाग्राम पोस्टमध्ये गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याची माहिती दिली आहे. या हल्ल्यात तिच्या पोटाला, पाठीला आणि हातालाही गंभीर दुखापत झाली आहे. दुसरीकडे आता याप्रकरणी अनिल गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार प्रिया सिंगने केलेल्या आरोपांवर गायकवाड कुटुंबीयांनी आता एक निवेदन जारी केले असून, खुनाच्या प्रयत्नासह प्रियाने केलेल्या सर्व आरोपांचे खंडन केले आहे. हा सगळा प्रकार घडला तेव्हा अश्वजित कुटुंबीयांसह आणि मित्रांसोबत एका कार्यक्रमामध्ये उपस्थित होता. तिथे त्याची पत्नी आणि मुलेही उपस्थित होते. ती मुलगी दारूच्या नशेत होती. मध्यरात्री अश्वजीतने तिच्या कॉल आणि मेसेजला प्रतिसाद न दिल्याने या मुलीने त्याला आणि त्याच्या मित्रांना शिवीगाळ आणि मारहाण करण्यास सुरुवात केली, असा दावा अनिल गायकवाड यांनी केला आहे.

“हा प्रकार घडला तेव्हा पहाटे 4 वाजले नव्हते तर पहाटेचे 1:30 किंवा 2 वाजले होते. त्या वेळी या मुलीने अश्‍वजितला मला भेटायचे आहे असे एसएमएस पाठवण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर ती देखील कोर्टयार्ड हॉटेलमध्ये पोहोचली आणि पार्टीमध्ये सहभागी झाली. होय, अश्वजीत त्याच्या मित्र आणि कुटुंबासह जिथे होता तिथे ती आतमध्ये घुसली. दोघांमध्ये काही भूतकाळ असेल, पण अश्वजीत सांगितले की तो आणि ती मुलगी फक्त मित्र मैत्रीण होती. अश्वजीतने सांगितले की, त्याने या मुलीला अनेक वेळा पैसे दिले आहेत. त्यावेळी जरी तो मुलीसोबत रिलेशनशिपमध्ये होता, तरीही त्यांचे आता ब्रेकअप झाले असावे,” असे गायकवाड कुटुंबियांनी सांगितले.