प्रेमासाठी पतीला सोडलेल्या महिलेची प्रियकराने केली हत्या

0
254

पिंपरी, दि. १४ (पीसीबी) : प्रियकराशी लग्न व्हावे यासारखे तिने पतीला सोडले. पण प्रियकराने दुसऱ्या महिलेशी लग्न करण्याचा घाट घातला. त्यामुळे महिलेने त्याच्याकडे लग्नाचा तगादा लावला. यावरून प्रियकराने महिलेचा खदानीत ढकलून खून केला. ही घटना 9 जानेवारी रोजी खराबवाडी येथील स्टोन क्रशरच्या खदानीत घडली.

देवेंद्रकुमार श्यामलाल लोधी (वय 27, रा. खराबवाडी, ता. खेड. मूळ रा. मध्य प्रदेश) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक विलास गोसावी यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत महिला आणि आरोपी देवेंद्रकुमार यांचे सन 2010 पासून प्रेम संबंध होते. सन 2018 मध्ये महिलेचे लग्न झाले. मात्र लग्नानंतर ती पतीपासून घटस्फोट घेण्यासाठी माहेरी येऊन राहू लागली. त्यानंतर तिचे देवेंद्रकुमार यांच्यासोबत पुन्हा बोलणे होऊ लागले. दरम्यान देवेंद्रकुमार याची त्याच्या भावाच्या मेहुणी सोबत लग्नाची बोलणी सुरू झाली. ही बाब महिलेला समजली असता तिने ‘लग्न करेल तर तुझ्या सोबतच करीन तुझ्या सोबतच राहील’ असा देवेंद्रकुमार याच्याकडे तगादा लावला. त्यामुळे तिचा खून करण्याचे ठरवून देवेंद्रकुमार याने तिला गावावरून बोलावून घेतले. दुचाकीवरून तिला खराबवाडी येथील डोंगरावर नेले. त्यानंतर जवळच असलेल्या स्टोन क्रशर मधील खदानी मध्ये उंचावरून ढकलून दिले. त्यामध्ये महिलेचा मृत्यू झाला. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.