प्रीपेड टास्क द्वारे तरुणीची साडेदहा लाख रुपयांची फसवणूक

0
221

पिंपरी, दि. २६ (पीसीबी) – प्रीपेड टास्क द्वारे पैशांचे आमिष दाखवून एका तरुणीची तब्बल साडेदहा लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. हा सर्व प्रकार 27 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर 2023 या कालावधीत निगडी प्राधिकरण येथे घडला .

तरुणीने सोमवारी (दि.24) निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीवरून पोलिसांनी तीन मोबाईल क्रमांक धारक व विविध बँकेत खाते असणाऱ्या पाच ते सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना 8807167571 या क्रमांकावरून दिव्या सिंग या महिलेने संपर्क साधला. यावेळी तिने प्रीपेड टास्क द्वारे ऑनलाईन पद्धतीने पैसे कमवण्याची ऑफर फिर्यादी यांना दिली. यावेळी त्यांना ऑनलाइन पद्धतीने रेटिंग देण्याचे काम सांगण्यात आले. मात्र हे काम प्रीपेड असल्याने सुरुवातीला तुम्हाला रक्कम भरावी लागेल असे सांगण्यात आले. यावेळी फिर्यादी यांना सुरुवातीला काही रक्कम मिळाली असता ती मिळवण्यासाठी फिर्यादी कडून वेळोवेळी पैसे मागण्यात आले. फिर्यादी कडून 10 लाख 58 हजार 801 रुपये घेत त्यांची फसवणूक केली. यावेळी फिर्यादी यांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता फिर्यादीचे सर्व नंबर आरोपींनी ब्लॉक केले आहेत. यावरून निगडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.