प्रारुप मतदार यादीवर हरकत घेण्यासाठी 15 दिवसांची मुदतवाढ द्या

0
380

– शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांची मागणी

पिंपरी, दि. २८ (पीसीबी) – आगामी महापालिका निवडणुकीसाठी प्रभागानुसार फोडण्यात आलेल्या मतदार याद्यांची विभागणी प्रभाग रचनेला अनुसरून झालेली नाही. नावे दुसऱ्या प्रभागांमध्ये चुकीच्या पद्धतीने जोडली आहेत. मतदार यादीतील मतदारांची नावे शोधण्यासाठी दिलेला अवधी खूपच कमी पडत आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाला विनंती करून हरकती नोंदविण्यासाठी आणखी 15 दिवसांची मुदतवाढ मिळवून घ्यावी अशी सूचना मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी महापालिका प्रशासनाला केली आहे.

याबाबत महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे. त्यात खासदार बारणे यांनी म्हटले आहे की, महापालिका निवडणूक शाखेने पिंपरी-चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणूक 2022 साठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या 23 जून 2022 रोजी प्रसिद्ध केल्या. त्यावर हरकती व सूचना दाखल करण्यासाठी 1 जुलै 2022 पर्यंत मुदत दिली आहे. प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या 9 जुलै रोजी प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. त्यामुळे प्रारुप मतदार याद्यावर हरकती आणि सूचना दाखल करण्यासाठी केवळ 8 दिवसांचा वेळ मिळाला आहे. हा कालावधी खूप कमी आहे.

प्रभागानुसार फोडण्यात आलेल्या मतदार याद्या परिपूर्ण प्रभाग रचनेला अनुसरून विभागणी केलेली नाही असे निदर्शनास येत आहे. सर्व प्रभागांमधील दीड ते अडीच हजार नावे मूळ प्रभागांमध्ये न राहता दुसऱ्या प्रभागांमध्ये चुकीच्या पद्धतीने जोडली आहेत. त्यामुळे प्रारूप मतदार यादीतील मतदारांची नावे शोधण्यासाठी संभाव्य उमेदवारांना व मतदारांना हरकतीसाठीचा अवधी खूपच कमी पडत आहे.

हरकती नोंदवण्यासाठी केवळ 8 दिवसांची म्हणजेच 1 जुलै 2022 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. ही मुदत कमी आहे. त्यामुळे हरकती घेण्यासाठी अजून पंधरा दिवसांची मुदतवाढ मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे महापालिका सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी प्रारूप मतदार यादीवर हरकत घेण्यासाठी 15 दिवसांची मुदतवाढ मिळणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे प्रारूप यादीवर हरकत घेण्यासाठी मुदतवाढ मिळावी. त्याबाबत राज्य निवडणूक आयोगाशी पत्रव्यवहार करावा आणि हरकतीसाठी मुदत वाढवून घ्यावी अशी सूचना खासदार बारणे यांनी केली आहे.