प्रामाणिक रिक्षा चालकाने पावणेसात लाखांचे दागिने केले परत

0
9

प्रवासी महिला रिक्षातून प्रवास करताना पावणे सात लाख रुपयांचे दागिने असलेली बॅग रिक्षामध्ये विसरली. मात्र प्रामाणिक रिक्षा चालकाने ती बॅग पोलिसांमार्फत संबंधित प्रवासी महिलेला परत केली. ही घटना नेवाळेवस्ती चिखली येथे 11 एप्रिल रोजी घडली.

नेवाळेवस्ती येथील प्रतिभा काळे यांनी 11 एप्रिल रोजी नेवाळेवस्ती येथून चिखली गाव येथे रिक्षाने प्रवास केला. चिखली गाव येथे उतरल्यानंतर रिक्षामध्ये त्यांची सोने असलेली पर्स विसरली असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ चिखली पोलिसांकडे धाव घेतली. प्रतिभा काळे यांना संबंधित रिक्षाचा क्रमांक माहिती नसल्याने रिक्षा चालकाचा शोध घेणे पोलिसांसमोरील आव्हान होते. पोलिसांनी नेवाळे वस्ती येथील रिक्षा स्टॉप वरून चिखली गाव दरम्यानच्या मार्गावरील वीस सीसीटीव्ही कॅमेऱ्याची पाहणी केली. त्यामधून प्रतिभा काळे यांनी प्रवास केलेल्या रिक्षाचा नंबर पोलिसांनी मिळवला. त्यानंतर संबंधित रिक्षा चालक बाळू जाधव (चिखली) यांची पोलिसांनी भेट घेतली. त्यांची विचारपूस केली असता त्यांनी संबंधित बॅग सुरक्षित ठेवली असल्याचे सांगितले. तसेच दागिने असलेली बॅग रिक्षाचालक बाळु जाधव यांनी पोलिसांना परत केली. पोलिसांनी प्रामाणिक रिक्षाचालक बाळू जाधव यांचा सत्कार केला.