प्रामाणिकपणे काम केल्या पक्षनेतृत्व संधी देते – आमदार महेश लांडगे

0
222

नवनिर्वाचित आमदार उमा खापरे यांचे जल्लोषात स्वागत
पिंपरी, दि. २४ (पीसीबी) – विधान परिषद निवडणुकीत विजय मिळवल्यानंतरपिंपरी-चिंचवड शहरात प्रथमच आगमन झालेल्या आमदार उमा खापरे यांचे शहर भाजपतर्फे मोठ्या जल्लोषात स्वागत केले. भक्ती-शक्ती चौक ते मोरवाडी येथील पक्षकार्यालय पर्यंत भव्य रॅली काढण्यात आली. तसेच, विजयोत्सव साजरा करण्यात आला.

शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे, माजी महापौर उषा ढोरे, माजी राज्यसभा खासदार अमर साबळे, चिंचवड विधानसभा निवडणूक प्रभारी शंकर जगताप, प्रदेश कार्यकारिणी सदस्य सदाशिव खाडे, प्रदेश सचिव अमित गोरखे, माजी सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, नामदेव ढाके, माजी महापौर केशव घोळवे, संघटन सरचिटणीस अमोल थोरात, सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, राजू दुर्गे, विजय फुगे, प्रदेश निमंत्रित सदस्य संतोष कलाटे, दक्षिण भारतीय आघाडीचे प्रदेश प्रमुख राजेश पिल्ले, महिला शहराध्यक्षा उज्ज्वला गावडे, युवा मोर्चा शहराध्यक्ष संकेत चोंधे, भाजपा महिला मोर्चा कोषाध्यक्षा शैलजा मोळक, माउली थोरात, वैशाली खाडे, रेखा कडाली, आशा काळे, शोभा भराडे, कैलास सानप, प्रदीप बेंद्रे, राणी कौर, तेजस्विनी कदम यांच्यासह सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमदार लांडगे म्हणाले की, राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीत मतदान करण्यासाठी आमदार लक्ष्मण जगताप आग्रह करुन आले. त्यांच्या पक्षनिष्ठेबाबत राज्यभरात चर्चा झाली. उमा खापरे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून भाजपाचे काम केले. त्यांना पक्षनिष्ठेचे फळ मिळाले. हा विजय आणि संधी भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी मार्गदर्शक आहे. प्रामाणिकपणे काम केल्या पक्षनेतृत्व संधी देते ही बाब लक्षात घेतली पाहिजे. तसेच, उमा खापरे यांच्या रुपाने पिंपरी-चिंचवडला पहिल्या महिला आमदार मिळाल्या. त्यासाठी राज्याचे नेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि सर्व पक्षश्रेष्ठींचे आभार मानतो, असेही आमदार लांडगे म्हणाले.

स्व. गोपीनाथ मुंडेंच्या छोट्या कार्यकर्तीला संधी मिळाली : उमा खापरे
आमदार उमा खापरे यांनी शहरात आल्यानंतर आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी खापरे यांचे जगताप कुटुंबियांकडून औक्षण करण्यात आले. आमदार जगताप आणि मुक्ता टिळक यांनी आजारी असतानाही मतदान केले. स्व. गोपिनाथ मुंडे यांची छोटी कार्यकर्ती म्हणून आज त्यांची खूप आठवण येत आहे. संघटनेत काम करीत असताना प्रत्येक कार्यकर्त्याला अपेक्षा असतात. गेली २५ वर्षे पक्षासाठी केलेल्या कामाची पोहोचपावती मिळाली. आमदार जगताप आणि लांडगे यांच्यासोबत त्यांची भगिनी म्हणून मी आगामी काळात काम करीन , असा विश्वास नवनिर्वाचित आमदार उमा खापरे यांनी व्यक्त केला.