प्राधीकरणाच्या वीजपुरवठ्यात रेल्वेच्या खोदकामाचा व्यत्यय

0
198
  • तीन दिवसांत तीनवेळा भूमिगत वीजवाहिनी तोडली

पुणे, दि. १३ : रेल्वे विभागाकडून जेसीबीद्वारे सुरु असलेल्या खोदकामात चिंचवड येथील बिजलीनगरमध्ये महावितरणची भूमिगत उच्चदाब वीजवाहिनी तीन दिवसांत तीनवेळा तोडण्यात आली. यात प्राधीकरण स्विचिंग स्टेशनचा वीजपुरवठा खंडित झाल्याने सुमारे २० हजार ग्राहकांना खंडित वीजपुरवठ्याचा नाहक मनस्ताप सहन करावा लागला तर महावितरणचे देखील मोठे आर्थिक नुकसान झाले.

याबाबत माहिती अशी की, महापारेषणच्या अतिउच्चदाब चिंचवड १३२ केव्ही उपकेंद्रातून महावितरणच्या चाकण २२ केव्ही वीजवाहिनीद्वारे प्राधीकरण येथील स्विचिंग स्टेशनला वीजपुरवठा केला जातो. या स्विचिंग स्टेशनमधून दोन उच्चदाब वीजवाहिन्यांद्वारे प्राधीकरण, निगडी व ओटास्कीम परिसराला वीजपुरवठा होतो.

सध्या, रेल्वे विभागाकडून बिजलीनगर येथे अस्तित्वात असलेल्या रेल्वेलाईनच्या बाजूला नवीन रेल्वेलाईन टाकण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी जेसीबीने खोदकाम करण्यात येत आहे. खोदकाम सुरु असलेल्या भागात महावितरणची भूमिगत चाकण २२ केव्ही वीजवाहिनी असल्याची माहिती रेल्वे विभागाला देण्यात आली होती. मात्र योग्य काळजी न घेतल्याने जेसीबीच्या खोदकामात शुक्रवारी (दि. ७), सोमवारी (दि. १०) आणि मंगळवारी (दि. ११) ही भूमिगत वीजवाहिनी तोडण्यात आली. त्यामुळे तीनही दिवस महावितरणचे प्राधीकरण येथील स्विचिंग स्टेशन बंद पडले. परिणामी प्राधीकरण, निगडी परिसरातील २० हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. महावितरणचे अभियंता व कर्मचाऱ्यांनी तांत्रिक उपाययोजना करीत पर्यायी व्यवस्थेतून १८ हजार ५०० ग्राहकांचा वीजपुरवठा एका तासात सुरु केला. मात्र पर्यायी वीजपुरवठ्याची सोय नसल्याने सुमारे १५०० ग्राहकांचा वीजपुरवठा तीनही दिवस सुमारे ३ ते ४ तास बंद राहिला.

रेल्वे विभागाच्या खोदकामात तोडलेली महावितरणची चाकण २२ केव्ही वीजवाहिनी जमिनीमध्ये तीन ते चार मीटर खोल आहेत. खोदकामामुळे झालेल्या खड्ड्यांमध्ये पावसामुळे पाणी साचले आहे. अशा स्थितीत तोडलेली वीजवाहिनी दुरुस्त करण्यासाठी महावितरणकडून तीनही दिवस युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात आले. यामध्ये वारंवार तोडल्याने खराब झालेल्या ठिकाणी २० मीटर नवीन वीजवाहिनी टाकण्यात आली. तसेच तोडलेल्या ठिकाणी एकूण ७ जॉईंट द्यावे लागले. यात मंगळवारी (दि. ११) तब्बल ४ जॉईंट द्यावे लागले. एक जॉईंट देण्यासाठी चार तासांचा कालावधी लागतो. दुरुस्तीच्या ठिकाणी अप-डाऊनच्या लोकल फेऱ्यांमुळे रेल्वेलाईनला धोका निर्माण होऊ नये याची काळजी घ्यावी लागली. तरीही महावितरणकडून लवकरात लवकर वीजपुरवठा सुरु करण्यासाठी अविश्रांत दुरुस्ती काम करण्यात आले.