प्राधिकरण विशेष नियोजन कार्यालय आता खराळवाडीत

0
481

पिंपरी, दि. १९ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे विशेष नियोजन प्राधिकरण कार्यालय खराळवाडी, पिंपरी के.एस.बी.पंपासमोर मुंबई-पुणे महामार्ग येथे स्थलांतरित झाल्याची माहिती भूमि आणि जिंदगी विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत जोशी यांनी दिली

महापालिकेने नव्याने विशेष नियोजन प्राधिकरण हा विभाग सुरु केला आहे. या विभागाचे कामकाज पूर्वी आकुर्डी रेल्वे स्टेशन जवळील पूर्वीच्या पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या इमारतीमधून चालत होते. त्यानंतर चिखली जाधववाडी येथील राजे शिवाजीनगर, चिखली प्रभाग क्रमांक 2, सेक्टर क्रमांक 16 येथील सावतामाळी उद्यानातील व्यायामशाळा इमारतीच्या पहिल्या मजल्यावर विशेष नियोजन प्राधिकरण कक्ष स्थलांतरित केला होता. या विभागाचे कामकाज हे प्राधिकरण परिसरातील रहिवाशांशी निगडीत आहे.

या रहिवाशांना कामकाजानिमित्त ये-जा करण्याच्या दृष्टीने गैरसोयीचे होते. त्याठिकाणी जाण्याकरिता बसची सुविधा नव्हती. त्यामुळे नागरिकांच्या सोईच्या दृष्टीने हे कार्यालय आता खराळवाडी येथे महापालिकेच्या नव्याने ताब्यात मिळालेल्या जागी स्थलांतरित करण्यात आले आहे. यामुळे प्राधिकरण येथील नागरिकांना कामाच्या दृष्टीने सोयीस्कर होऊन त्यांची कामे त्वरित करण्यासाठी मदत होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.