प्राधिकरणा संपादित जागांवरच्या अवैध बाधकामांनाप्रापर्टी कार्ड देणार – महसूलमंत्री बावनकुळे यांचे आश्वासन

0
35

पिंपरी चिंचवड शहराच्या ड्रोन सर्वेक्षणानंतर प्रत्येक घराचे ड्रोन मॅपिंग करून सरकारी नकाशा देण्याचे आश्वासन राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज निवडणूक प्रचार सभेत दिले.वाल्हेकरवाडी, बिजलीनगर प्रभाग क्रमांक १७ मधील उमेदवार नामदेव ढाके, सचिन चिंचवडे, पल्लवी वाल्हेकर आणि आशा सुर्यवंशी यांच्या प्रचारासाठी शुभम गार्डन येथे आयोजित सभेत ते बोलत होते. आमदार शंकर जगताप यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.
नवनगर विकास प्राधिकऱणाच्या संपादीत क्षेत्रावर सुमारे २५ हजार अवैध बांधकामे आहेत. दंड घेऊनही ती बांधकामे नियमीत होत नसल्याने आता प्रापर्टी कार्डचा मधला मार्ग काढण्यात आला आहे. महसूलमंत्री बावनकुळे यांनी आश्वासन दिल्याने त्याचा फायदा भाजपच्या उमेदवारांना संभवतो.
आपल्या भाषणात ते म्हणाले, प्रापर्टी कार्ड दिल्यावर सर्वांच्या घराचे नकाशे हे गुगलवर उपलब्ध होतील. उद्याच्याला कोणी कुठेही गुगल सर्च केले आणि स्वतःचे नाव टाकले की जागेवर तुम्हाला घराचा नकाशा उपलब्ध होईल. बँकेत जा किंवा कोणत्याही शासकीय कार्यालयात जा तुम्हाला प्रॉपर्टी कार्ड सहज उपलब्ध होणार आहे. अट फक्त एक आहे की, यासाठी महापालिकेने एक ठराव करून राज्य सरकारकडे पाठवायचा आहे असे स्पष्ट करून ते म्हणाले, तम्ही कमळाला मते दिलीत की घरांचे संपूर्ण सरकारी मॅपिंग करून तुमच्या घरांटे प्रॉपर्टी कार्ड घरोघरी देणार आहोत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नाव नघेता ते म्हणाले, ज्यांनी सर्व अवैध बांधकामांना शास्तीकर लावला तेच लोक आता मते मागायला येणार आहेत. उद्या ते सत्तेत आले तर भाजपने काढलेला शास्तीकर ते पुन्हा लावतील. विकासाची चार चाकाची गाडी मनपा समोर उभी आहे. एक चाक नरेंद्र मोदींच्या ५५ योजनांचे तर, दुसरे फडणवीस यांच्या ४८ योजनांचे आहे. तिसरे चाक मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या योजनांचे तर चौथे चाक आमदार शंकर जगताप यांच्या योजनेचे आहे. या गाडिचा ड्रायव्हर कोण असणार त्याचा निर्णय तुम्हाला १५ जानेवारीला करायचा आहे. भाजपचा महापौर करून गाडीची चावी भाजप कार्यकर्त्याच्या हाती द्या, असे आवाहन त्यांनी केले.