प्राधिकरणातील ‘या’ दोन नगरसेवकांना भाजपमध्ये घेवू नका; अनुप मोरे यांची शहराध्यक्ष महेशदादा यांच्याकडे विनंती

0
287

पिंपरी, दि. १९ (पीसीबी) – निगडी, प्राधिकरणातील भाजपचे सर्व इच्छुक उमेदवार एका स्टेजवर आहेत. प्राधिकरणातून अपेक्षित असलेला निकाल आम्ही 100 टक्के पक्षाला देवू, भविष्यात काही चुकीची लोक पक्षात येवू शकतात. असे आमच्या टीमला, जमलेला लोकांना वाटत आहे. ते नाही आले पाहिजेत. याची तुम्हाला हात जोडून विनंती आहे. कारण, 2017 च्या निवडणुकीत इथले दोन विद्यमान नगरसेवक (राजू मिसाळ, अमित गावडे) आताप्रमाणे प्राधिकरण तीनचा प्रभाग झाला असता. तर, कागदावरील आकडेवारीप्रमाणे ते दोघे उमेदवार पडलेले आहेत. त्यामुळे त्यांना पक्षात घेवू नका अशी कळकळीची विनंती भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश महामंत्री अनुप मोरे यांनी शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे यांच्याकडे केली.

त्यामुळे कार्यकाळ संपल्याने माजी झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नगरसेवक, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चेला पुष्टी मिळाली आहे. तर, दोन गटात विभागलेल्या शिवसेनेचे माजी नगरसेवक अमित गावडे हेही भाजपमध्ये जाणार का, या चर्चेला यानिमित्ताने उधाण आले आहे. अनुप मोरे यांनी कोणाचे नाव घेतले नसले तरी प्राधिकरणातील दोन नगरसेवक म्हणत स्पष्टपणे मिसाळ, गावडे यांच्याकडे अंगुलीनिर्देश करत दोघांनाही पक्षात घेण्यास तीव्र विरोध केला. निगडी प्राधिकरण येथील बूथ, शक्ती केंद्र प्रमुखाचा आणि कार्यकर्त्यांचा मेळावा रविवारी पार पडला. शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे, विधानपरिषदेच्या आमदार उमा खापरे, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, माजी महापौर आर.एस.कुमार, माजी नगरसेवक राजु दुर्गे, माजी नगरसेविका शैलजा मोरे, शर्मिला बाबर यासह भाजपकडून महापालिका निवडणूक लढवू इच्छिणारे सर्व इच्छुक उमेदवार उपस्थित होते.

बूथ प्रमुखांच्या मेळाव्यात बोलताना अनुप मोरे म्हणाले, “भाजपचे सर्व इच्छुक उमेदवार एका स्टेजवर आहेत. प्राधिकरणातून अपेक्षित असलेला निकाल आम्ही भाजपला 100 टक्के देवू, भविष्यात काही चुकीची लोक पक्षात येवू शकतात. असे आमच्या टीमला, जमलेला लोकांना वाटत आहे. ते नाही आले पाहिजेत. याची तुम्हाला हात जोडून विनंती आहे. कारण, 2017 च्या निवडणुकीत इथले दोन विद्यमान नगरसेवक (मिसाळ, गावडे) जर आताप्रमाणे प्राधिकरण तीनचा प्रभाग झाला असता. तर, कागदावरील आकडेवारीप्रमाणे ते दोघे उमेदवार पडलेले आहेत. फक्त खालचा भाग जोडला गेला. काही कारणांमुळे त्यांना मते मिळाली आणि ते निवडून आले. नाही तर आकड्याप्रमाणे ते दोन्ही उमेदवार पडले असते”.

“मागच्यावेळी आर.एस कुमार राष्ट्रवादी काँग्रेसकडून अरुण थोरात यांच्या विरोधात लढले होते. आज तेसुद्धा आपल्या स्टेजवर आहेत. त्यामुळे आमदार महेशदादा तुम्हाला हात जोडून एकच विनंती असेल भविष्यात तुम्ही निवडणुकीत पूर्ण ताकद द्या आणि आता पक्षात जे लोक आहेत, त्यांनाच घेऊन आम्हाला पुढे चालू द्या, नवीन कुठला उमेदवार येवून आम्हा सगळ्यांमध्ये फक्त नाराजी नको. जर त्यांची क्षमता असती तर आम्ही तुम्हाला म्हणू की तुम्ही त्यांना 100 टक्के पक्षात घ्या, आम्ही त्यांच्या मागे हातात झेंडे घेऊन फिरू, पण 2017 सुध्दाला कमी मताने आणि नशिबाने निवडून आले आहेत. कर्तृत्ववाने निवडून आले नाहीत. त्यामुळे त्यांना पक्षात घेऊ नका तेवढी तुम्हाला हात जोडून विनंती राहील”, असे मोरे म्हणाले.

दरम्यान, निगडी प्राधिकरणातून राजू मिसाळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर सलग तीनवेळा महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले. राष्ट्रवादी काँग्रेसनेही मिसाळ यांना क्रीडा समिती सभापती, प्रभाग अध्यक्ष, उपमहापौर केले. सत्ता गेल्यानंतर 2017 मध्ये मिसाळ यांना पहिल्याच वर्षी स्थायी समितीचे सदस्यत्व दिले. दोन वर्षे ते स्थायीचे सदस्य होते. त्यानंतर अनेक प्रबळ दावेदारांना डावलून अजितदादा पवार यांनी मिसाळ यांना विरोधी पक्षनेतेपद दिले. पक्षाने एवढे देवूनही राजू मिसाळ आता भाजपमध्ये प्रवेश करू इच्छित आहेत. मागील काही महिन्यांपासून याबाबत शहराच्या राजकीय वर्तुळात चर्चा होती. नुकत्याच झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचार मंथन शिबिराकडेही मिसाळ यांनी पाठ फिरवली होती. पण, आता भाजपच्या अनुप मोरे यांनी थेटपणे मिसाळ यांना पक्षात घेवू नका म्हटल्याने मिसाळ भाजपच्या संपर्कात असल्याचे स्पष्ट होते. भाजपचे शहराध्यक्ष, आमदार महेशदादा लांडगे यांच्याशी मिसाळ यांच्याशी मैत्रीचे संबंध आहेत. त्यांचा मैत्रीचा ग्रुप आहे. आमदार लांडगे यांच्या माध्यमातूनच मिसाळ भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा शहराच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.

तर, अमित गावडे हे माजी महापौर आर.एस.कुमार यांचा पराभव करून 2017 मध्ये निवडून आले आहेत. शिवसेनेच्या तिकिटावर पहिल्यांदाच ते महापालिकेत निवडून आले आहेत. आता शिवसेना दोन गटात विभागाली आहे. त्यामुळे मागील टर्ममधील शिवसेनेचे नऊ नगरसेवक ठाकरे गटात राहतात की शिंदे यांच्या गटात जातात किंवा दुसऱ्याच पक्षात प्रवेश करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.