प्राथमिक शाळेतील ४० विद्यार्थ्यांना मारहाण, सहायक शिक्षिका निलंबित, मुख्याध्यापकांची बदली

0
65

सांगली, दि. 23 (पीसीबी) : सांगली महानगरपालिकेच्या 29 नंबरच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना जबर मारहाण केल्याबद्दल सहायक शिक्षिका विजया शिंगाडे यांना निलंबित करण्याचा, तर प्रभारी मुख्याध्यापक मारुती माळी यांची बदली करण्याचा निर्णय सांगली मनपा आयुक्त डॉ. शुभम गुप्ता यांनी घेतला.

सांगली-मिरज आणि कुपवाड शहर महापालिका कार्यक्षेत्रातील प्राथमिक शाळा क्र. 29 मध्ये गुरुवारी (दि. 17) सहायक शिक्षिका विजया सुरेश शिंगाडे यांच्याकडून विद्यार्थ्यांना मारहाणीचा प्रकार घडला होता. याबाबत पालक व विद्यार्थ्यांनी तक्रार केली होती. या प्रकरणी सांगली मनपा उपायुक्त विजया यादव, सहायक आयुक्त सचिन सागावकर, शिक्षण प्रशासन अधिकारी रंगराव आठवले यांनी सदर प्रकरणी चौकशी केली. यामध्ये विद्यार्थ्यांना मारहाण झाल्याचे निष्पन्न झाले. ही बाब गंभीर स्वरूपाची असल्याने महापालिका आयुक्त डॉ. शुभम गुप्ता यांनी गंभीर नोंद घेऊन मुख्याध्यापक मारुती माळी यांची बदली, तर सहायक शिक्षिका विजया सुरेश शिंगाडे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली.

शाळा प्रशासनास सूचना देऊन शालेय कामकाजात कोणत्याही प्रकारे बेशिस्तपणा खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा दिला. शालेय कामकाज नियमाने आणि शिस्तीत होणे आवश्यक आहे, त्याकामी प्रशासकीय अधिकारी यांनी सर्व मुख्याध्यापक आणि शिक्षक यांच्यात समन्वय साधून कामकाजात सुधारणा करावी, अशी सूचनाही त्यांनी दिली.