प्राजक्ता माळीने घेतली नितीन गडकरी यांची भेट

0
175

नागपूर, दि. २५ (पीसीबी) – आपल्या अभिनयाच्या आणि नृत्याच्या जोरावर अभिनेत्री प्राजक्ता माळीने मराठी मनोरंजनसृष्टीत स्वत:चं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. प्राजक्ता सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. तिच्या चाहत्यांबरोबरचे विविध फोटो, व्हिडीओ, वैयक्तिक आयुष्यात आलेले अनुभव ती सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करत असते. यामुळेच तिच्या चाहत्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. प्राजक्ता माळीच्या अनेक पोस्ट व्हायरल होत असतात. सध्या अभिनेत्रीने शेअर केलेल्या अशाच एका फोटोने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
नवरात्र उत्सवानिमित्त अभिनेत्री प्राजक्ता माळी नागपूरला गेली होती. यावेळी एका कार्यक्रमाच्या आयोजकांशी समन्वय साधून अभिनेत्रीला नितीन गडकरी यांची भेट घेता आली. या भेटीचा संपूर्ण अनुभव अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

प्राजक्ता माळीची पोस्ट –
मी आणि केंद्रिय मंत्री नितीनजी नागपूरात एका कार्यक्रमानिमित्त एका मंचावर उपस्थित राहण्याचा योग जुळून येता येता राहिला. आयोजकांना म्हटलं, सहज शक्य झालं तर मला त्यांना भेटायला खूप आवडेल आणि नितीनजींनी तात्काळ वेळ दिला. नवमीला नितीनजींच्या निवासस्थानी ही ‘ग्रेट भेट’ झाली. त्यामुळे सबंध परिवारालाही भेटता आलं.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा, माझे आगामी projects, श्री श्री रविशंकरजी, प्राजक्तराज, समृद्धी महामार्ग’…अशा अनेक विषयांवर अर्ध्या तासाहून अधिक वेळ गप्पा झाल्या. ‘श्री श्रींचं माझ्यावर पुत्रवत प्रेम आहे आणि आम्ही तुमची हास्यजत्रा रोज बघतो’ हे ऐकून मला विशेष आनंद झाला..निघताना त्यांच्या घरच्या देवीचं दर्शन घ्यायला लावलं, त्यांच्या कामावर लिहिली गेलेली ८-९ पुस्तकं दिली, नैसर्गिक कापसापासून बनवलेली खादी साडी दिली. (जी मी लगेच दुसऱ्या दिवशी विजयादशमी उत्सवात नेसली. ) आयुष्यभर स्मरणात राहील अशा या भेटीसाठी वेळ दिल्याबद्दल नितीनजींचे मनापासून आभार.

प्राजक्ताची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. दरम्यान, यंदाच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवाला सुद्धा प्राजक्ता माळी अतिथी म्हणून मंचावर उपस्थित राहिली होती. लागोपाठ राजकीय क्षेत्राशी संबंधित भेटीगाठी केल्याने प्राजक्ताच्या काही चाहत्यांनी तिला राजकारणात प्रवेश करण्याचा सल्ला दिला आहे.