प्रसिद्ध संगीतकार अजय-अतुलवर महिलेचा आरोप

0
477

पुणे : बालेवाडी येथे झालेल्या एका इव्हेन्टमध्ये संगीतकार अजय-अतुल (Ajay Atul) यांनी आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप राधिका कुलकर्णी (Radhika Kulkarni) या आयोजक महिलेने केला आहे. या महिलेने सहकाऱ्यांसह संगीतकार अजय-अतुल यांच्या विरोधात काळे झेंडे घेऊन रविवारी सायंकाळी अण्णाभाऊ साठे सभागृहासमोर निदर्शने केली.

अण्णाभाऊ साठे सभागृहात फिरोदिया करंडक पारितोषिक वितरण कार्यक्रमास अजय-अतुल हे प्रमुख पाहुणे म्हणून येणार असल्याचे समजताच कुलकर्णी यांनी निदर्शने करण्याची परवानगी पोलिसांकडे  मागितली होती. या प्रकरणी संगीतकार अजय-अतुल यांची प्रतिक्रिया समजू शकली नाही.

अ‍ॅड. राधिका कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या भागीदार असलेल्या गोल्डन पिरॅमिड  एंटरटेनमेंट कंपनीने सन २०१७ साली संगीतकार अजय -अतुल यांची बालेवाडी स्टेडियम येथे  कॉन्सर्ट आयोजित केली होती. या कॉन्सर्टसाठी अजय -अतुल यांना मानधन द्यायचे ठरले आणि देण्यात आले. ईमेलवर कबूल केल्याप्रमाणे ठरलेले नामवंत  कलाकार त्यांनी या कार्यक्रमात सहभागी करणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात मात्र ठरलेले मोठे कलाकार आले नाहीत. त्यामुळे तिकीट विक्रीच्या माध्यमातून गोल्डन पिरॅमिड एंटरटेनमेंट कंपनीला अपेक्षित रक्कम जमा करणे शक्य झाले नाही. गोल्डन पिरॅमिड एंटरटेनमेंट कंपनीला काही कोटी रुपयांचा  फटका बसला. अनेक गुंतवणूकदार यामुळे हवालदिल झाले .

गोल्डन पिरॅमिड एंटरटेनमेंट कंपनीने (Golden Pyramid Entertainment Company) त्यांचे कोट्यवधी रुपये वसूल व्हावेत व गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत मिळावेत याकरिता कलर्स मराठी चॅनलला संबंधित लाईव्ह कॉन्सर्ट प्रदर्शित करण्यासाठी प्रस्ताव ठेवला. संगीतकार अजय-अतुल यांनी या इव्हेंटचे आयोजक स्वतःच असल्याचे सांगून कलर्स मराठीला प्रसारणाचे हक्क विकले. त्यातून मोठी कमाई केली.अशा तऱ्हेने त्यांनी गायक  म्हणून मानधन घेतले. ठरलेले कलाकार तर नाही आणले, पुढे स्वतःच आयोजक असल्याचे भासवून कलर्स मराठीला हक्क विकले. फसवणूक करत  संगीतकार गायक अजय-अतुल जोडीने ही रक्कम हडप केली. पाठपुरावा करणाऱ्या आयोजकांना प्रतिसाद दिला नाही असा आरोप अ‍ॅड. कुलकर्णी यांनी निदर्शनानंतर माध्यमांशी बोलताना केला. कलर्स मराठी विरोधात यापूर्वीच अ‍ॅड.कुलकर्णी आणि त्यांच्या भागीदारांनी उच्च न्यायालयात खटला दाखल केला आहे.