प्रशासकीय काळात अकार्यक्षम, अपारदर्शक अन् भ्रष्ट कारभार… राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांची टीका.

0
189

पिंपरी, दि. 12 (पीसीबी) – वर्षभरापासून पिंपरी-चिंचवड महापालिकेत सुरू असलेल्या प्रशासकीय राजवटीत शहर विकासाचा एकही महत्त्वाचा निर्णय झालेला नाही. ठराविक राजकारण्यांच्या हातचे बाहुले बनलेल्या प्रशासकाच्या काळात केवळ अकार्यक्षम, अपारदर्शक आणि भ्रष्ट कारभार सुरू असल्याची टीका राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी केली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेत 13 मार्च 2022 पासून प्रशासकीय राजवट सुरू आहे. या प्रशासकीय राजवटीला आज रविवारी (दि. 12) एक वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर गव्हाणे यांनी एक पत्रक प्रसिद्धीस दिले असून त्यात म्हटले आहे की, गेल्या वर्षभराच्या काळात लोकप्रतिनिधी ऐवजी महापालिकेचा कारभार प्रशासकाच्या माध्यमातून सुरू आहे. सुरुवातीच्या दोन ते अडीच महिन्यांच्या काळात राजेश पाटील हे प्रशासक होते. त्यांच्या काळात काही प्रमाणात योग्य पद्धतीने सुरू असलेला कारभार शेखर सिंह हे प्रशासक म्हणून रुजू झाल्यानंतर अक्षरश: धुळीस मिळाला आहे.

वर्षभरापासून शहरातील पाणीटंचाईची समस्य अत्यंत गंभीर बनली आहे. मात्र त्यावर कोणतीही उपाययोजना करण्यात आयुक्तांना यश आलेले नाही. कोट्यवधी रुपये खर्च करूनही स्वच्छतेचा प्रश्न कायम आहे. ड्रेनेज सफाईच्या बाबतीतही प्रशासकीय धोरणे अपुरी ठरली आहेत. या कालावधीत महापालिकेत भ्रष्टाचाराचे उच्चांक गाठला असून आयुक्त सर्वसामान्य नागरिकांना भेटही नाहीत हे दुर्देव आहे. संवादाचाच अभाव असल्यामुळे सध्या मनमानी पद्धतीने महापालिकेचा कारभार चालविला जात आहे.

स्थायी समिती व सर्वसाधारण सभेचे अधिकार आयुक्तांकडे एकवटल्यामुळे आयत्या वेळच्या विषयांवर भर दिला जात आहे. दोन्ही सभांचे अजेंडे, विषयांना देण्यात आलेली मंजुरी या बाबीही कोणालाच समजू दिल्या जात नाहीत. सर्वसाधारण सभा यापूर्वी नागरिकांसाठी खुली होती ती आता बंद दरवाजाआड होत आहे. त्यामुळे शहरहिताच्या निर्णयाऐवजी ठराविक लोकांच्या हिताचे आणि भ्रष्टाचार करण्याच्या हेतूने निर्णय घेतले जात आहेत. प्रशासकीय राजवटीत शहराचा विकास खुंटला असल्याचेही गव्हाणे म्हणाले. लोकहित आणि लोकशाही बळकटीसाठी निवडणुका लवकरात लवकर घेऊन प्रशासकीय राजवट हटविण्यात यावी, अशी मागणीही गव्हाणे यांनी केली आहे.