पिंपरी, दि. ९ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील लोकप्रतिनिधींचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने सध्या महापालिकेचा कारभार प्रशासनाच्या हाती आहे. मात्र, प्रशासक राजवटीतही लोकप्रतिनिधींचाच कित्ता गिरवला जात आहे. महापालिकेतील क्रीडा आणि वैद्यकीय विभागातील अधिकाऱ्यांनी भुवनेश्वर, दिल्लीतील पाहणी दौऱ्यावर दोन लाख रुपये उडविले आहेत.
पिंपरी-चिंचवड शहरात दाट लोकवस्तीच्या भागात साधारणतः आठ हजार ते दहा हजार वस्ती असलेला भाग, झोपडपट्टी भाग, जास्त मनुष्यवस्ती, चाळी अशा ठिकाणी एक किलोमीटरच्या अंतरात ज्या ठिकाणी महापालिकेचे रुग्णालय, दवाखाने उपलब्ध नाहीत, अशा ठिकाणी दिल्ली शहरातील मोहल्ला क्लिनिकच्या धर्तीवर जिजाऊ क्लिनिक सुरू करण्यात येणार आहे. या क्लिनिकसाठी महापालिकेच्या मालमत्ता, खासगी मालमत्ता या भाडेतत्त्वावर घेऊन अथवा कंटेनरद्वारे सेवा उपलब्ध करून घेण्याचे प्रस्तावित आहे.
हा उपक्रम सुरू करण्यासाठी महापालिका वैद्यकीय विभागातील अधिकाऱ्यांनी 4 ते 7 मे या कालावधीत दौरा काढला. या दौऱ्यात महापालिकेचे सहायक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, वायसीएम रुग्णालय पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे सहायक प्राध्यापक डॉ. अतुल देसले, स्थापत्य मुख्य कार्यालयाचे कार्यकारी अभियंता प्रमोद ओंबासे, अनुप पानसे आणि श्रीती मित्रा हे सहभागी झाले होते.
तळेगाव-दाभाडे येथील कपला हॉलीडेज या एजन्सीमार्फत या अधिकाऱ्यांनी पुणे ते दिल्ली, दिल्ली अंतर्गत मोटार प्रवास आणि दिल्ली ते पुणे विमान प्रवास असा दौरा केला. या दौऱ्यासाठी 70 हजार 477 रुपये या एजन्सीला देण्यात येणार आहेत. वैद्यकीय विभागाच्या सन 2022-23 च्या अंदाजपत्रकातील प्रवास भत्ता या लेखाशीर्षातून हा खर्च करण्यात येणार आहे. भुवनेश्वर व विशाखापट्टणम येथे हॉकी खेळासाठी विश्व स्तरावरच्या सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत.
या धर्तीवर हॉकी खेळासाठी दर्जेदार सुविधा पिंपरी-चिंचवड शहरात निर्माण करण्यासाठी महापालिकेतील क्रीडा विभागाच्या अधिकारी तीन दिवसांचा भुवनेश्वर पाहणी दौरा काढला. 3 ते 5 एप्रिलपर्यंतच्या या दौऱ्यात महापालिका क्रीडा विभागाचे सहायक आयुक्त, क्रीडा स्थापत्य विभागाचे सहशहर अभियंता, ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयाचे क्रीडा पर्यवेक्षक आदी सहभागी झाले होते. या दौऱ्यासाठी विमान प्रवास, जाणे-येणे, हॉटेल निवास, भोजन, नाश्ता व्यवस्था आणि स्थानिक प्रवासासाठी एकूण 1 लाख 34 हजार रुपये खर्च आला.