इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकी देणाऱ्या, तथा छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. इतिहासकार इंद्रजित सावंत यांना धमकी देणे आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधाने करणे या आरोपाखालील प्रशांत कोरटकर यांना पोलिसांनी अटक केली आहे.
धमक्या दिल्यानंतर कोरटकर 25 फेब्रुवारीपासून फरार होता. पोलिसांना गुंगारा देत होता. कोल्हापूर पोलीस गेल्या अनेक दिवसांपासून प्रशांत कोरटकरचा शोध घेत होते. पोलिसांनी नुकतीच कोरटकर यांच्या पत्नीची चौकशी केली होती. त्यावेळी त्यांनी प्रशांत कोरटकर चंद्रपूरला गेल्याचे सांगितले होते. त्यामुळे कोल्हापूर पोलिसांचे पथक तात्काळ चंद्रपूरला रवाना झाले. पण तिथं कोरटकर पोलिसांच्या हाती लागला नाही. त्यानंतर कोरटकर परदेशी पळून गेल्याचा संशय व्यक्त केला जात होता. त्याचा दुबईतील फोटो व्हायरल झाल्यानंतर कोलकाता विमानतळावरुन तो दुबईला पळून गेल्याचा संशय व्यक्त करण्यात येत होता. प्रशांत कोरटकरने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. पण न्यायालयाने तो फेटाळला आहे.
इंद्रजीत सावंत यांनी कोरटकर विरोधात कोल्हापुरातील जुना राजवाडा पोलिस ठाण्यात तक्रार नोंद केली होती. त्यामुळे कोरटकरला आता कोल्हापूरला आणण्यात येणार आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
कोरटकरने इंद्रजित सावंत यांना 24 फेब्रुवारीच्या मध्यरात्री 12 वाजण्याच्या आसपास फोन केला होता. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करत सावंतांना धमकी दिली होती. इंद्रजित सावंतांचा नंबर त्यानं कोल्हापूर पोलिस दलात कार्यरत असलेल्या एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याकडून मिळवल्याची माहिती आहे. 25 फेब्रुवारीला इंद्रजित सावंत यांच्या तक्रारीवरून कोल्हापूरच्या राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.