- पदभार तात्पुरता प्रमोद भोसले यांच्याकडे
- ५२ कोटींच्या घोटाळ्यात आयुक्तांचा दणका
पिंपरी, दि. ११ – पिंपरी चिंचवड महापालिकेचे मुख्य लेखा परीक्षक प्रमोद भोसले यांच्याकडे महापालिकेच्या मुख्य लेखा व वित्त अधिकारी पदाचा तात्पुरता अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. याबाबत महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या स्वाक्षरीने आदेश जारी करण्यात आले आहेत. ५२ कोटींच्या बिलांची सखोल चौकशी होईपर्यंत आयुक्तांनी जैन यांना सक्तीच्या रजेवर पाठविले आहे.
दरम्यान, बनावट स्वाक्षऱ्या आणि उपसुचनांद्वारे ७० कामांचे ५२ कोटी रुपये परस्पर अदा केल्यानेच लेखा विभागाचे प्रमुख प्रवीण जैन यांच्याकडील पदभार भोसले यांच्या हाती सुपूर्द केल्याची चर्चा आहे. जैन यांच्या सर्व कारभाराचीच चौकशी होणार असल्याचे समजले.
आदेशात म्हटले आहे की, सन २०२५-२०२६ चे सुधारित व सन २०२६-२०२७ चे मूळ अंदाजपत्रकातील तरतुदींमध्ये वाढ/घट करून करण्यात आलेल्या बिल अदायगी तसेच मागील तीन वर्षांतील तत्सम प्रकरणांची चौकशी करून अहवाल सादर करण्याबाबत दिनांक ९ एप्रिल २०२६ रोजी चौकशी करण्यासाठी समिती गठित करण्यात आलेली आहे. या प्रकरणाचे गांभीर्य, वित्तीय शिस्तीशी संबंधित बाबींचा विचार करता, चौकशी निष्पक्ष, पारदर्शक व प्रभावीपणे पार पाडण्यासाठी महापालिकेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी तथा संचालक (वित्त) प्रवीण जैन यांना पुढील आदेश होईपर्यंत सक्तीच्या रजेवर पाठविण्यात येत आहे. तसेच चौकशी प्रक्रियेत कोणताही प्रभाव पडू नये व कार्यालयीन कामकाज सुरळीत राहावे यासाठी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी या पदाचा तात्पुरता अतिरिक्त कार्यभार पुढील आदेशापर्यंत प्रमोद भोसले, मुख्य लेखा परीक्षक यांच्याकडे सोपविण्यात येत आहे










































