‘प्रवास ऑलिम्पिकचा‘ प्रदर्शनास सुरूवात

0
58

ज्ञान प्रबोधिनी विद्यालयातील क्रीडाकुल विभागाचा उपक्रम

पिंपरी, दि. 30 जुलै (पीसीबी) – पॅरिस ऑलिंपिक 2024 च्या निमित्ताने ऑलिंपिकचा प्रवास सांगणारे विशेष प्रदर्शन निगडी, प्राधिकरण येथील ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालयातील क्रीडाकुल विभागाने भरवले आहे. या प्रदर्शनाास सोमवारी (दि.29) सुरूवात झाली. प्रदर्शन पाहण्यासाठी विद्यार्थी, खेळाडू व पालकांनी गर्दी केली आहे. हे प्रदर्शन रविवार (दि.4) पर्यंत खुले राहणार आहे.

ऑलिंपिक स्पर्धांची माहिती, त्यांचा इतिहास, क्रीडा विज्ञान, भारताचे ऑलिम्पिकमधील स्थान, यासोबतच खेळाडूंच्या प्रेरणादायी कथा अशा सर्वांचे एकत्रित प्रदर्शन तक्तांच्या स्वरूपात मांडले आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी कै. हेमंत जोगदेव यांचे सुपुत्र वसंत जोगदेव, क्रीडा विभागाचे सहाय्यक आयुक्त पंकज पाटील, शिक्षणविभागाचे सहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात, ऑलम्पिक कुस्तीपटू मारुती आडकर आणि ऑलिपिंक मॅरेथॉन धावपटू बाळकृष्ण अकोटकर, महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष शरदचंद्र धारूरकर, शिवछत्रपती पुरस्कार विजेते शीतल मारणे, ज्ञान प्रबोधिनी विद्यालयाचे निगडी केंद्र प्रमुख डॉ. मनोज देवळेकर, क्रीडाकुलाचे प्रमुख भगवान सोनवणे आदी उपस्थित होते.

कै. क्रीडा लेखक हेमंत जोगदेव यांनी क्रीडा जगतासाठी दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल हे प्रदर्शऩ त्यांना समर्पित केले गेले. कार्यक्रमात क्रीडाकुलचा माजी विद्यार्थी आणि मेक्सिको येथे होणार्‍या जागतिक तिरंदाजी स्पर्धेत निवड झालेला प्रथमेश फुगे हिचा सत्कार करण्यात आला. सहाय्यक आयुक्त पंकज पाटील यांनी सर्व क्रीडाकुल टीमचे अभिनंदन केले. प्रदर्शनासाठी घेतलेले परिश्रम, संकलित केलेली माहिती, ऑलिम्पिक प्रदर्शनाद्वारे सर्वांसाठी खुला केलेला इतिहास, त्यातील क्रीडाप्रकार, खेळाडू घडण ही सर्व माहिती अभ्यासपूर्ण आहे. सर्वांसाठी हे प्रदर्शन खुले करावे, तसेच क्रीडाविषयक धोरण, प्रत्येक खेळाची महिती, अ‍ॅकॅडमीमधील खेळाडू विद्यार्थी या सगळ्यांपर्यंत हे प्रदर्शन पोहचवावे, अशी विनंती केली.

अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी मी ज्ञान प्रबोधिनीचा प्रतिनिधी म्हणून तुमच्यासमोर उभा आहे अशी सुरुवात करत क्रीडाकुलने मांडलेल्या प्रदर्शनाबद्दल आनंद व्यक्त केला. यानिमित्ताने त्यांनी ऑलम्पिकच्या इतिहासात हेलसिंकीपासून सुरु झालेल्या भारतीय खेळाडूंची पदक संख्या कशी वाढत गेली यांची मांडणी केली. तसेच महापालिकेने दिलेल्या क्रीडा सुविधांचा उपयोग आपण करून घेतला पाहिजे, असे आवाहन यानिमित्ताने त्यांनी केले.

ज्ञान प्रबोधिनीचे केंद्रप्रमुख डॉ. मनोज देवळेकर यांनी या प्रदर्शनाच्या निमित्ताने अशी विविध प्रकारची प्रदर्शने भरवावीत. त्यातून ऑलिंपिकची चळवळ गावोगावी पोहोचवावी असे मत व्यक्त केले. जिथे माणूस मनाने, बुद्धीने, सर्व अंगाने विकसित होतो तोच खरा देश. यासाठी क्रीडा मैदानावर पराक्रम दाखवणे हेच गरजेचे आहे, असे ते म्हणाले.

प्रदर्शन पाहण्यासाठी पहिल्याच दिवशी विद्याथी, खेळाडू व पालकांनी गर्दी केली होती. अनेक विद्यार्थी माहिती लिहून घेत होते. तक्तांवरील माहिती जाणून घेत होते. प्रदर्शन सकाळी 9 ते रात्री 9 या वेळेत सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे. प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मनोज देवळेकर यांनी केले आहे. ज्ञान प्रबोधिनीच्या प्राचार्य विदया उदास यांनी स्वागत केले. निखिल सोनोने यांनी प्रास्ताविक केले. मंजुषा पुरोहित यांनी सुत्रसंचालन केले. पाहुण्यांचा परिचय वैद्य दीप्ती धर्माधिकारी यांनी करुन दिला. क्रीडाकुलाचे प्रमुख भगवान सोनवणे यांनी आभार मानले. तुषार भरगुडे, पूर्वा देशमुख, स्वाती ढमाले, संपदा कुलकर्णी, नागेश जोशी ,नरेंद्र जाधव, क्रीडा प्रशिक्षण व शिक्षकांनी संयोजन केले.