प्रलोभनास बळी न पडता मतदान करू – अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे

0
4

पिंपरी, दि. 24 (पीसीबी) :- ‘’आम्ही, भारताचे नागरिक, लोकशाहीवर निष्ठा ठेवून, याद्वारे प्रतिज्ञा करतो की, आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करू आणि मुक्त नि:पक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणूकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणूकीत निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू’’ अशी शपथ अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, चंद्रकांत इंदलकर यांच्या उपस्थितीत महापालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घेतली.

२५ जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिवस संपुर्ण देशात उत्साहात साजरा केला जातो. महानगरपालिकेच्या वतीने देखील २५ जानेवारी रोजी कार्यालयीन सुट्टी असल्याने शासन निर्णयानुसार पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीत आज राष्ट्रीय मतदार दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सह शहर अभियंता बाबासाहेब गलबले, उप आयुक्त अण्णा बोदडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, लेखाधिकारी अनिल पासलकर, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह विविध विभागातील कर्मचारी उपस्थित होते. शपथेचे वाचन जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.

महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय यांच्या निर्देशानूसार २५ जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा केला जातो. त्या अनुषंगाने १८ वर्षे पुर्ण झालेल्या नवोदित मतदारांचा मतदार यादीत समावेश करणे व त्यांचा मतदान प्रक्रियेत सहभाग वाढविणे हा या यामागचा मुख्य उद्देश आहे. भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना २५ जानेवारी १९५० रोजी झाली. यानंतर २६ जानेवारी १९५० पासून देशात संविधानाची अंमलबजावणी सुरू झाली. २५ जानेवारी २०११ रोजी भारताच्या तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या विशेष उपस्थितीत पहिला राष्ट्रीय मतदार दिवस साजरा केला गेला. तेव्हापासून दरवर्षी २५ जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो.