पिंपरी, दि. १६ (पीसीबी) : राज्यात सत्तांतर होताच आगामी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर भाजप नेते सरसावले आहेत. भाजप आमदार महेश लांडगे यांनी शुक्रवारी पालिकेचे प्रशासक तथा आयुक्त राजेश पाटील यांच्यासमवेत बैठक घेतली. शहराच्या दृष्टीने ‘मोठ्या’ प्रकल्पांविषयी सविस्तर चर्चा करतानाच प्रलंबित प्रश्नांचे प्रस्ताव तातडीने राज्य सरकारकडे पाठवावेत, अशा सूचना त्यांनी बैठकीत केल्या.
आयुक्तांच्या कार्यपध्दतीविषयी आमदार लांडगे यांनी काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली होती. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आधीचे चित्र काहीसे बदलल्याचे शुक्रवारी दिसून आले. आमदार लांडगे आणि आयुक्त यांच्यातील बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. प्रशासक काळात पालिकेने कोणते नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले, याविषयी आमदारांसमोर सादरीकरण करण्यात आले. यापुढील काळात कोणते प्रकल्प राबविण्यात येणार आहेत, याबाबत सविस्तर माहिती आमदारांना देण्यात आली. शहराच्या मध्यवर्ती भागात उभारण्यात येणारा सिटी सेंटर प्रकल्प, महापालिकेची नियोजित नवीन प्रशासकीय इमारत, भोसरीतील कुस्ती प्रशिक्षण केंद्र, सफारी पार्क, मोशीचे स्टेडियम आदी विषयांवर बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.
आगामी पालिका अर्थसंकल्पात शाळा, शहरातील रुग्णालयासाठी भरीव तरतूद करा. ‘एक्झिक्यूटिव्ह इंजिनियर’ दर्जाचा स्वतंत्र प्रकल्प अधिकारी नियुक्त करावा, अशा सूचना आमदारांनी दिल्या. ‘डियर सफारी पार्क’ तसेच मोशी येथील क्रिकेट स्टेडियम या दोन्ही नियोजित प्रकल्पांचा प्रस्ताव राज्य शासनाकडे तातडीने पाठवा, अशा सूचना करत त्याबाबत शासनाकडे पाठपुरावा करू, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.