प्रयत्न करत राहणे, पुढे जाणे हा खेळाडूचा गुणधर्म – पुलेला गोपीचंद

0
368

पिंपरी, दि. १० (पीसीबी) – यश, अपयश, दुखापत, जीवनातील चढउतार या बाबी खेळाडूंच्या आयुष्याचा भाग आहेत. कठीण काळात खचून न जाता सातत्याने प्रयत्न करत राहणे आणि पुढे जाणे हा खेळाडूचा गुणधर्म असतो, अशा प्रक्रियेमधून मधून गेल्याने खेळाडूंचे उत्तम व्यक्तिमत्व घडत असते, असे प्रतिपादन पद्मभूषण पुलेला गोपीचंद यांनी केले.

पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पुणे जिल्हा व महानगर बॅडमिंटन असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने 84 व्या राष्ट्रीय वरिष्ठ गट बॅडमिंटन स्पर्धा 2023 चे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने महापालिकेच्या वतीने आंतरराष्ट्रीय बॅडमिंटपट्टू पद्मभूषण पुलेला गोपीचंद यांचा सत्कार समारंभ पिंपळेगुरव येथील नटसम्राट निळू फुले नाट्यगृह येथे आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष अरुण लखानी, विलु पूनावाला फौन्डेशनचे सीईओ जसविंदर नारंग, सह शहर अभियंता मनोज सेठिया, उप आयुक्त विठ्ठल जोशी, सहाय्यक आयुक्त बाळासाहेब खांडेकर, प्रशांत जोशी, रविकिरण घोडके, जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह महापालिकेचे कर्मचारी, विविध संस्थांचे प्रतिनिधी, प्रशिक्षक, खेळाडू, विद्यार्थी, नागरिक उपस्थित होते.

खेळाडूंच्या आयुष्यात येणारे चढउतार हे खेळाडूला जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टीकोन शिकवतात. लोकांनी विजेत्या खेळाडूंसह पराभूत खेळाडूंचे ही मनोबल वाढविल्यास त्यांना भविष्यात उत्कृष्ट कामगिरी करण्याची प्रेरणा मिळते. पालकांनी आपल्या पाल्याच्या क्षमता लक्षात घेऊन त्यांच्या सुप्त गुणांना प्रोत्साहन दिल्यास त्यांचे उत्तम भविष्य घडू शकते, असे देखील गोपीचंद यांनी सांगितले.

आयुक्त शेखर सिंह म्हणाले, शहरात महापालिकेच्या वतीने बॅडमिंटन, कुस्ती, हॉकी, क्रिकेट, आर्चरी, स्विमिंग, रोईंग, रायफल शुटींग, अॅथलेटीक्स अशा विविध खेळांसाठी मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांची निर्मिती करण्यात आली असून यामधून राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू घडत आहे. शहरात लोकप्रिय तसेच दुर्मिळ खेळ व साहसी खेळांचे संवर्धन करण्यात येत आहे. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असून यामुळे शहराच्या नावलौकिकात भर पडत आहे. शहराला क्रीडानगरी म्हणून ओळख निर्माण करण्यासाठी महापालिका प्रयत्नशील आहे.

यावेळी पुणे जिल्हा महानगर बॅडमिंटन असोसिएशन च्या मॅस्कॉटचे अनावरण पुलेला गोपीचंद यांचा हस्ते करण्यात आले. तसेच 84 व्या राष्ट्रीय वरिष्ठ गट बॅडमिंटन स्पर्धा 2023 सुरु होण्यासाठी 75 दिवसांचा अवधी शिल्लक असल्याने ‘काउंटडाऊन 75” या इवेंटची सुरुवात देखील करण्यात आली. दरम्यान, बॅडमिंटन खेळात उत्कृष्ट कामगिरी महापालिका क्षेत्रातील खेळाडू व प्रशिक्षकांचाही सत्कार पुलेला गोपीचंद यांच्या हस्ते करण्यात आला.