प्रभाग रचना अडिच महिन्यांत, ४ सप्टेंबरला होणार अंतिम

0
8

दि . १४ ( पीसीबी ) – राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचे आदेश निघाल्यानंतर गुरुवारी नगर विकास विभागाने मुंबईसह ठाणे, नाशिक, पुणे अशा २९ महापालिका तसेच नगरपरिषद आणि पंचयात समित्यांच्या प्रभाग रचनेचे प्रारुप तयार करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम घोषित केला. त्यानुसार २२ ऑगस्ट २०२५ ते ४ सप्टेंबर २०२५ या दरम्यान अंतिम प्रभाग रचना अधिसूचनेद्वारे प्रसिद्ध करावी लागणार आहे. वेळापत्रकानुसार कार्यवाही पूर्ण करण्याचे आदेश राज्यातील महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी, नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिल्यानंतर निवडणूक आयोग आणि राज्य सरकारने निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. त्याचाच भाग म्हणून राज्यातील महापालिका, नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या प्रभार रचना करण्याचे आदेश नगरविकास विभागाने दोन दिवसांपूर्वी दिले होते. विभागाने आज प्रभाग रचनेसंदर्भातील कालबद्ध कार्यक्रम घोषित केला. या संदर्भातील एक पत्र महापालिकांचे आयुक्त, नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या मुख्याधिकाऱ्यांना पाठविण्यात आले आहे.

या वेळापत्रकानुसार मुंबई महापालिकेसह २९ सह अन्य महापालिका तसेच नगरपंचायत आणि नगरपरिषदेच्या प्रगणक गटाची मांडणी व प्रभाग रचनेची तयारी ११ जूनपासून सुरु करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यातील या कार्यक्रमाला १६ जूनपर्यंत मुदत आहे. तसेच मुंबईसह अ, ब, क वर्गाच्या महापालिकांना २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर दरम्यान तर ड वर्गाच्या महापालिका आणि नगरपरिषद तसेच नगरपंचायतींना २२ ऑगस्ट ते १ सप्टेंबर दरम्यान राज्य निवडणूक आयुक्तांनी अंतिम केलेली प्रभाग रचना अधिसूचनेद्वारे प्रसिद्ध करावी लागणार आहे.

मुंबई आणि अ, ब, क वर्ग महापालिकांच्या प्रभाग रचनेचे वेळापत्रक
११ ते १६ जून : प्रगणक गटाची मांडणी
१७ ते १८ जून : जनगणनेची माहिती तपासणी
१९ ते २३ जून : स्थळ पाहणी करणे
२४ ते ३० जून : गुगल मॅपवर प्रभागाचे नकाशे तयार करणे
१ ते ३ जुलै : नकाशावर निश्चित केलेल्या प्रभाग हद्दींची जागेवर जाऊन तपासणी
४ ते ७ जुलै : प्रभाग रचनेच्या मसुद्यावर समितीने सह्या करणे
८ ते १० जुलै : प्रारुप प्रभाग रचनेचा प्रस्ताव निवडणूक आयोगाला पाठवणे
२२ ते ३१ जुलै : प्रारुप प्रभाग रचना प्रसिद्ध करणे, त्यावर हरकती आणि सूचना मागवणे
१ ते ११ ऑगस्ट : हरकतींवर सुनावणी घेणे
१२ ते १८ ऑगस्ट : हरकती आणि सूचनांवरील शिफारशी विचारात घेऊन अंतिम प्रभाग रचना निवडणूक आयोगाला पाठवणे
२९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर : आयोगाने अंतिम केलेली प्रभाग रचना अधिसूचनेद्वारे प्रसिद्ध करणे