पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभागनिहाय आरक्षण निश्चितीसाठी राज्य निवडणूक आयोगाने मार्गदर्शक सूचना जारी केल्यानंतर आता आरक्षण साेडतीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. आरक्षण सोडतीची माहिती ११ नोव्हेंबरला आयोगाला सादर करावी लागणार आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक चार सदस्यीय पद्धतीने हाेणार असून ३२ प्रभागांतून १२८ नगरसेवक निवडले जाणार आहेत. महापालिका निवडणुकीसाठी सहा ऑक्टोबरला अंतिम प्रभागरचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये सहा प्रभागांत बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे आरक्षणात बदल होतील. आरक्षण निश्चितीसाठी राज्य निवडणूक आयोगाने मार्गदर्शक अध्यादेश जारी केला आहे. त्यानंतर आता आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.
आरक्षित जागांची संख्या निश्चित करून ४ नोव्हेंबरपर्यंत त्यास आयोगाची मान्यता घ्यावी लागणार आहे. आरक्षण सोडतीची जाहीर सूचना आठ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. आरक्षण काढून सोडतीचा निकाल आयोगाच्या मान्यतेसाठी ११ नोव्हेंबर रोजी सादर करावा लागणार आहे. प्रभागातील अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी), इतर मागासवर्ग (ओबीसी) तसेच खुल्या गटातील या सर्व राखीव जागांवर महिलांसाठी असलेल्या जागेचे चित्र कसे असेल, याकडे इच्छुकांचे लक्ष लागले आहे.
अशी असेल प्रक्रिया
१)आरक्षित जागांची संख्या निश्चित करून चार नोव्हेंबरपर्यंत आयोगाची मान्यता घेणे
२)आरक्षण सोडतीची जाहीर सूचना आठ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करणे
३)आरक्षण सोडत काढून सोडतीचा निकाल ११ नोव्हेंबर रोजी आयोगाच्या मान्यतेसाठी सादर करणे
४)प्रारूप आरक्षण सोडतीवर २४ नोव्हेंबरपर्यंत हरकती, सूचना स्वीकारणार
५) हरकती, सूचनांवर आयुक्तांनी १ डिसेंबरपर्यंत निर्णय घेणे
६) आयोगाच्या मान्यतेनंतर अंतिम आरक्षणाची अधिसूचना २ डिसेंबर रोजी शासन राजपत्रात प्रसिद्ध केली जाईल.
आरक्षणानंतर चित्र स्पष्ट हाेणार
‘एससी’च्या २०, ‘एसटी’च्या तीन, ‘ओबीसी’साठी ३५ जागांवर आणि खुल्या गटातील ३५ जागांवर महिलांचे आरक्षण पडण्याची शक्यता आहे. प्रभागातील अ, ब, क आणि ड या जागा कोणाला सुटणार, एकूण १२८ पैकी महिलांसाठी कोणत्या प्रभागातील जागा असतील, याबाबत इच्छुकांसह माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांचे लक्ष लागले आहे.
प्रभागनिहाय आरक्षण साेडतीचा राज्य निवडणूक आयोगाचा आदेश प्राप्त झाला आहे. सोडत काढण्यासाठी नऊ ते ११ नोव्हेंबर अशी तीन दिवसांची मुदत आहे. आयुक्तांशी चर्चा करून सोडत कधी काढायची याचा निर्णय घेण्यात येईल, असे महापालिकेच्या निवडणूक विभागातून सांगण्यात आले.














































