प्रफुल्ल पटेल, सुनिल तटकरे यांच्यावर अपात्रतेच्या कारवाईचे पत्र

0
305

मुंबई, दि. ३ (पीसीबी) : अजित पवारांच्या बंडाला ज्या लोकांनी पाठिंबा दिला आहे त्या सर्व राष्ट्रवादीच्या नेत्या-पदाधिकाऱ्यांवर स्थानिक पातळीवर आज कारवाईला वेग आला आहे. त्याचबरोबर आता राष्ट्रीय पातळीवर देखील कारवाईसाठी सुप्रिया सुळे यांनी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना विनंती केली आहे. याबाबतच पत्र सुळे यांनी पवारांना लिहिलं आहे.

सुळे यांनी पत्रात म्हटलं की, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी 2 जुलै 2023 रोजी पक्षाच्या घटना आणि नियमांचे थेट उल्लंघन करून पक्षाचे सदस्यत्व सोडलं त्यामळं ते अपात्र ठरले आहेत. यानंतर आता माझी शरद पवारांना विनंती आहे की, त्यांनी तात्काळ कारवाई करून पक्षविरोधी कारवायांमध्ये गुंतल्याप्रकरणी भारतीय राज्यघटनेच्या 10 व्या अनुसूची अंतर्गत संसद सदस्य प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या विरोधात सक्षम प्राधिकाऱ्यासमोर अपात्रतेची याचिका दाखल करावी.

सुप्रिया सुळेंनी लिहिलेलं सविस्तर पत्र
प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे या राष्ट्रवादीच्या दोन खासदारांनी देशाची राज्यघटना आणि आपल्या पक्षाच्या नियमांचं उल्लंघन करून पक्षविरोधी कारवाया केल्या आहेत, हे कळवण्यासाठी मी अत्यंत तातडीने लिहिते आहे. या दोघांनी राजभवन, मलबार हिल्स, मुंबई इथं दुपारी 2:30 वाजता महाराष्ट्र सरकारचे कॅबिनेट मंत्री म्हणून 9 आमदारांचा शपथविधी सोहळा पार पडला आणि नेतृत्व केलं. त्यांनी या संदर्भात प्रसारमाध्यमांसमोर उघडपणे विधाने केली आहेत. पक्षाच्या निर्देशांचे आणि तत्त्वांचे पूर्ण उल्लंघन केले आहे. यापार्श्वभूमीवर तुम्हाला कळविण्यात येते की 2 खासदारांना 9 आमदारांना पाठिंबा देण्याचा हा निर्णय पक्षाध्यक्षांच्या परवानगीशिवाय आणि सर्व सदस्यांना विश्वासात न घेता घेतला आहे.