प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत ऑनलाईन अर्जासाठी मुदवाढ द्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी

0
310

पिंपरी, दि. २७ (पीसीबी) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने प्रधानमंत्री आवास योजनेसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. त्यासाठीची मुदत उद्या २८ जुलै रोजी संपुष्टात येत आहे. सर्वसामान्य नागरिकांना अर्ज सादर करताना द्यावयाच्या कागदपत्रांसाठी अनेक अडचणी येत असल्यामुळे या योजनेंतर्गत अर्ज सादर करण्यासाठी एक महिन्याची मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी केली आहे.

याबाबत गव्हाणे यांनी आयुक्तांना लेखी निवेदन दिले असून त्यात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महापालिकेने प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आकुर्डी आणि पिंपरी येथे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी 938 घरांचा प्रकल्प राबविला आहे. या योजनेत घर घेण्यासाठी इच्छुक असलेल्या नागरिकांना अर्ज करण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे. ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी 28 जून ते 28 जुलै असा तीस दिवसांचा कालावधी दिला होता.

अर्जासाठी विविध प्रकारच्या दहा कागदपत्रांची पुर्तता करण्याचे बंधन अर्जदारास टाकण्यात आले आहे. महापालिकेने मागितलेली विविध दहा प्रकारच्या कागदपत्रांमध्ये उत्पन्न दाखला, जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र, नोंदणीकृत भाडे करारनामा, अधिवास प्रमाणपत्रांसह इतर कागदपत्रांचा समावेश आहे. या कागदपत्रांची पुर्तता कारण्यासाठी इच्छुकांना मोठा कालावधी लागत आहे. वेळेत कागदपत्र उपलब्ध होत नसल्याने अनेक इच्छुक अर्ज करण्यापासून वंचित राहू शकतात. शहरातील नागरिकांसाठी हा अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प असल्याने इच्छुक नागरिकांना अर्ज करण्यासाठी आणखी तीस दिवसांचा कालावधी वाढवून देण्यात यावा, अशी मागणी गव्हाणे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.